‘माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सहावी उत्तीर्ण होते. शुल्क भरायला पैसे नसल्याने त्यांना शिक्षण सोडावे लागले होते’, असे प्रतिपादन करीत ‘आता मात्र खोटय़ा पदव्यांचा सोस आहे,’ असे जोरदार टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या मंत्र्यांवर सोडले आहे. ‘महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की खरेदी प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. हे आरोप गंभीर असून त्यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच निर्णय घेतील, असे ठाकरे यांनी सांगितले. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी हे खोटय़ा पदवीच्या वादात अडकले आहेत. या पाश्र्वभूमीवर ठाकरे यांनी खरमरीत टीका केली. ‘आता राजकारणात खोटय़ा पदव्या दाखविल्या जातात. खोटय़ाच्या मागे का लागता,’ असा सवालही ठाकरे यांनी केला.
शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी यांच्या ‘धंदा कसा करावा’ या पुस्तकाचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते प्रभादेवी येथील कोहिनूर हॉलमध्ये गुरुवारी झाले. यावेळी ठाकरे यांनी भाजप मंत्र्यांबाबतच्या वादांवर भाष्य केले.
मुंबईतील नालेसफाईची चौकशी करण्याची मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केली होती. त्यावर बोलताना ‘अहमदाबादमध्येही पाऊस पडल्याने नाले भरले. त्याचीही चौकशी करायला हवी,’ असा टोला ठाकरे यांनी लगावला. ‘माझ्या संकल्पनेतील सागरी किनारपट्टी रस्ता (कोस्टल रोड) कोळी बांधवांना बेघर करणारा नसेल. त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. त्यांचे आक्षेप दूर केले जातील,’ असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
वाढवण बंदराला विरोध
जैतापूरपाठोपाठ शिवसेनेने डहाणूजवळ वाढवण बंदर उभारण्यास विरोध केला आहे. मच्छिमारांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ दिला जाणार नाही, असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. डहाणूजवळ वाढवण येथे मोठे बंदर उभारण्याची १९९८ मध्ये शिवसेना-भाजपचे सरकार असताना योजना होती. तेव्हा बंदर उभारण्याकरिता शिवसेनेने पुढाकार घेतला होता पण भाजपने तीव्र विरोध केला होता. या वेळी सत्तेत आल्यावर वाढवण बंदराकरिता भाजपने पुढाकार घेताच शिवसेनेने विरोधी भूमिका घेतली आहे. वाढवण बंदर उभारण्याकरिता अलीकडेच केंद्रीय बंदरेमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि राज्य शासनात करार झाला. हे बंदर खोल समुद्रात उभारण्यात येणार आहे.
भाजपने या बंदराकरिता पुढाकार घेतला असला तरी शिवसेनेने विरोधी भूमिका घेतली आहे. मच्छिमारांच्या मुळावर येणारे बंदर कोणत्याही परिस्थितीत होऊ दिले जाणार नाही, असा इशारा शिवसेनेचे मच्छिमार नेते आणि पालघरचे संपर्कप्रमुख अनंत तरे यांनी वाढवण येथे झालेल्या मेळाव्यात दिला. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे मच्छिमारांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. वाढवण बंदरामुळे मच्छिमारांचा व्यवसायच धोक्यात येऊ शकतो. पाकिस्तानची हद्द जवळ असल्याने आधीच मच्छिमारीवर मर्यादा येतात. त्यात वाढवण बंदरामुळे मच्छिमारांच्या पोटावर पाय येईल, असे तरे यांनी सांगितले.