मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने २५०० कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त केल्यानंतर आता याप्रकरणी शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. सर्वच आठ आरोपींविरोधात ४८१८ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.आरोपी शमशुल्ला खान, अयुब शेख, रेश्मा चंदन, रियाझ मेमन, प्रेमप्रकाश सिंह, किरण चौधरी, रमेंद्र कुमार दीक्षित व जिनेंद्र वोरा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात आतापर्यंत दोन हजार ४३५ कोटी १४ लाख रुपयांचे (१२१८किलो) मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी विशेष एनडीपीएस न्यायालयात शुक्रवारी ४८१८ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई : करोना संसर्ग आटोक्यात आल्याने मुंबईतील दहा जम्बो करोना केंद्र बंद

मुंबईतील शिवाजीनगर, गोवंडी येथून २९ मार्च रोजी शमशुल्ला खान या तस्कराला २५० ग्रॅम एमडीसह ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर अंमलीपदार्थ विरोधी विभागाच्या वरळी कक्षाला अंमलीपदार्थांच्या विक्रीच्या साखळीची माहिती मिळवली होती. त्यानंतर अंमलीपदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या टोळीतील प्रमुख आरोपी व रसायनशास्त्रातील पदवीधर प्रेमप्रकाश सिंह याच्यासह एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याजवळून तब्बल एक हजार ४३५ कोटी रुपये किंमतीचे ७०५ किलो एमडी जप्त केले होते.

हेही वाचा >>> कोणत्या युक्तिवादाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली? वाचा…

प्रेमप्रकाश याने पोलिसांच्या चाैकशीत गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर तालुक्यातील पानोली येथील जीआयडीसीमध्ये असलेल्या आणखी एका कारखान्याचे नाव उघड केले. प्रेमप्रकाश हा गिरीराज दीक्षित याच्याकडून एमडी बनवून घेत होता. त्यानुसार गुन्हेशाखेच्या पथकाने १३ ऑगस्ट रोजी पानोली येथील कारखान्यावर छापा मारला. या कारवाईत गुन्हेशाखेने गिरीराज दीक्षितला ताब्यात घेतले आणि ५१३ किलो एमडीसह एमडी तयार करण्याच्या प्रक्रियेतील ८१२ किलो पांढऱ्या रंगाची भुकटी आणि ३९७ किलो वजनाचे तपकिरी रंगाचे खडे असा कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थांची किंमत एक हजार २६ कोटी रुपये होती. नुकतीच या प्रकरणी अंबरनाथ येथील कारखान्याच्या मालकाला अटक केली. जीनेंद्र वोरा असे अटक आरोपीचे नाव असून याप्रकरणातील मुख्य आरोपी प्रेमप्रकाश सिंह याने २०२० मध्ये वोराच्या कंपनीत मेफेड्रॉनची निर्मिती केल्याचा आरोप आहे. प्रेमप्रकाश सिंह याच्या चौकशीत वोराचे नाव उघड झाले होते. त्यानुसार वोराला अटक करण्यात आली. प्रेमप्रकाशने किमान चार वेळा वोराच्या कंपनीत एमडीची निर्मिती केली होती. त्यासाठी वोराला ३५ लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chargesheet filed against eight accused in rs 2500 crore mephedrone case mumbai print news amy