विशिष्ट विकासकासाठी प्रक्रियेला तिलांजली
कच्छी लोहाना समाजातील गरजूंना स्वस्त भाडय़ात घर उपलब्ध करण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या कच्छी लोहाना गृह ट्रस्टने माझगाव येथे मोक्याच्या ठिकाणी असलेला सुमारे दोन एकर भूखंड विकसित करण्याच्या नावाखाली विकासकाच्या घशात घालण्यासाठी मृत वकिलाचा रबर स्टॅम्प बनविण्याइतपत मजल मारल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. विशिष्ट विकासकाला फायदा व्हावा यासाठी निविदा प्रक्रियाच बनावट पद्धतीने राबविली गेली. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केली होती. परंतु ती नंतर थंडावली.
कच्छी लोहाना गृह ट्रस्टला मिळालेला भूखंड शासकीय असल्यामुळे त्याची विक्री करताना परवानगी न घेतल्याबद्दल भायखळा पोलीस ठाण्यात ट्रस्ट तसेच विकासकाविरुद्ध शहर जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यातच विकासकाला फायदा होईल अशा रीतीने निविदा प्रक्रिया राबविल्याची बाबही आता पुढे आली आहे. या भूखंडावर सध्या २२५ भाडेकरूंचे वास्तव्य आहे.
भाडेकरूंच्या पुनर्विकासासह एकूणच ट्रस्टच्या मालमत्तेचा पुनर्विकास करण्यासाठी निविदा मागविण्यात आली. परंतु प्रत्यक्षात हा भूखंड विकण्यात आला, असा आरोप तक्रारदार प्रवीणा रुपारेल यांनी केला आहे. याबाबत श्रीमती रुपारेल यांनी आवश्यक ती कागदपत्रे मिळवून हा बनाव उघड केला. या प्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यासह गुन्हे अन्वेषण विभागाच्या एन. एम. जोशी मार्ग युनिटकडे तक्रार करण्यात आली.
गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणी चौकशीही सुरू केली. परंतु नंतर अचानक ही चौकशी थंडावण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या चौकशीचा तपशील श्रीमती रुपारेल यांनी माहिती अधिकारात मागितला. परंतु तो देण्यासही टाळाटाळ केली जात आहे.
माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीनुसार विठ्ठल कन्स्ट्रक्शन, क्षितिज इंटरनॅशनल, एस. व्ही. डेव्हलपर्स, नेहा कन्स्ट्रक्शन, अतुल खिमजी देसाई आमि गोल्ड प्लाझा डेव्हलपर्स यांनी निविदा सादर केल्या. डिमांड ड्राफ्ट आवश्यक असतानाही एस. व्ही. डेव्हलपर्सने धनादेश जारी केला.
हा धनादेश डोंबिवलीतील कॅनरा बँकेचा मे. नेहा कन्स्ट्रक्शन या नावे होता. नेहा कन्स्ट्रक्शनने सादर केलेला धनादेशही याच बँकेच्या नावे होती. क्षितिज इंटरनॅशनलने पाच कोटींचा धनादेश दिला. गोल्ड प्लाझा डेव्हलपर्सने फक्त डिमांड ड्राफ्ट सादर केला. त्यामुळे गोल्ड प्लाझा वगळता अन्य निविदा केवळ नावापुरत्या घेण्यात आल्याचे स्पष्ट होते, असे श्रीमती रुपारेल यांनी म्हटले आहे. याबाबतची कागदपत्रे ‘लोकसत्ता’कडे आहेत. गोल्ड प्लाझा डेव्हलपर्सची निविदा स्वीकारताना अॅड. जगजीवनदास नाथानी यांचा जो रबर स्टॅम्प बनविण्यात आला आहे त्यावर एमएएच/१२१/२०१० असे नमूद आहे. प्रत्यक्षात अॅड. नाथानी यांचा नोंदणी क्रमांक एमएएच/२१/२०१० असल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. ज्या ३० ऑगस्ट २०१० रोजी सायंकाळी ४.५५ वा. निविदा स्वीकारल्याचे दाखविण्यात आले आहे त्याआधी दुपारी अॅड. नाथानी यांचे निधन झाल्याचे मृत्यू प्रमाणपत्रच श्रीमती रुपारेल यांनी मिळविले आहे.याबाबत कच्छी लोहाना ट्रस्टचे विश्वस्त तुळशीदास डुंगरसी-ठक्कर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्याला याबाबत काहीही माहिती नाही, असे सांगितले. जी काही प्रक्रिया झाली आहे ती कायदेशीर असल्याचा दावाही त्यांनी केला.