पदपथावर विविध रोगांवरील ‘दवा’ विकणाऱ्या भटक्या विमुक्तांतील वैदू समाजातील  शाळाबाह्य़ मुले आता मुख्य प्रवाहात सामील होणार आहेत. मुंबईतील वैदू समाजाच्या १५ वस्त्यांमध्ये वर्षभर सुरू असलेल्या सर्वेक्षणातून ४१२ मुले ही शाळाबाह्य़ असल्याचे समोर आले आहे. शाळेपासून वंचित राहिलेल्या या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी अनेक सामाजिक संघटना आणि मदतगारांनी दर्शविली आहे.

मुंबईत जोगेश्वरी, विरार, कळवा, विठ्ठलवाडी, मानखुर्द या भागांत वैदू समाजाच्या साधारण १५ वस्त्या आहेत. या वस्तीतील सुमारे ४१२ मुले ही शाळाबाह्य़ असल्याचे वैदू समाजातील स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. यात शाळाबाह्य़ मुलींची संख्या सुमारे २७४ इतकी आहे. घरात लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी, घरकामासाठी मुलींना शाळेत पाठविण्यात अटकाव केला जात असल्याचे या समाजातील स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले. आजही या समाजातील मुलांना पैशांअभावी शाळेपासून वंचित राहावे लागत आहे. या ४१२ मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी काही सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत. प्रत्येक मुलामागे वर्षांला साधारण २० हजार इतका खर्च करण्याची गरज असून शाळेचे शुल्क, पुस्तके, गणवेश आदी वस्तूंचा खर्च या पैशांतून केला जाणार आहे. या संघटना प्रत्येक वर्षांच्या जून महिन्यात शाळा आणि मुलांच्या नावाने धनादेश काढून हा खर्च करणार आहेत.

२०१५ मध्ये ‘जातपंचायती मूठमाती अभियाना’ला प्रतिसाद देऊन खापपंचायत बरखास्त करणारा वैदू समाज आता समाजातील शाळाबाह्य़ मुलांना शिक्षणाची कास धरण्यास मदत करीत आहे. केवळ शिक्षण विभागावर अवलंबून न राहता विकासाची वाट स्थानिक वैदू समाजातील तरुणांनी धरली आहे, असे वैदू समाजातील कार्यकर्ती दुर्गा गुडिलू हिने सांगितले.

वैदू समाजाबरोबरच या परिसरात राहणाऱ्या वडार, नंदीबैल, गवंडी या समाजातील तरुण कार्यकर्तेही या उपक्रमात सहभागी होत आहेत. यापुढे वडार व पुलाखालीच संसार मांडणाऱ्या नंदीबैल या भटक्या विमुक्त समाजातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपक्रम राबविणार आहे, असेही दुर्गा हिने नमूद केले.