मुंबई : चर्नीरोड येथील वसतिगृहातील विद्यार्थिनीच्या हत्येच्या दिवशी आरोपीने तिच्या खोलीत प्रवेश कसा केला? याबाबत मरिन ड्राइव्ह पोलीस तपास करत आहेत. वसतिगृहाच्या आतील प्रवेशद्वार बंद असल्यामुळे तो पाइपलाइनद्वारे पहिल्या मजल्यावर पोहोचला असावा, अशी माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे.
चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या विद्यार्थिनीच्या खोलीत प्रवेश करून आरोपीने तिच्या खोलीचे दार कसे उघडले, याबाबत पोलीस तपास करत आहेत. आरोपीकडे या मृत विद्यार्थिनीच्या खोलीची चावी आधीपासूनच होती का? त्याने बनावट चावी तयार केली होती का? अथवा कुठल्या दुसऱ्या पद्धतीने त्याने दार उघडले का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत १० हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
मृत विद्यार्थिनीच्या मैत्रिणीने सर्वप्रथम मृतदेह पाहिला होता. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत तिच्याबरोबर होती. तसेच सकाळी तिने या विद्यार्थिनीला अनेक वेळा दूरध्वनी केले. या काळात कुटुंबीयांनीही तिला दूरध्वनी केले होते. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तिच्या मैत्रिणीने अखेर सायंकाळी वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावरील नोंदवही तपासली. त्यानुसार ही विद्यार्थिनी वसतिगृहात आल्याची नोंद होती. पण बाहेर गेल्याची कोणतीही नोंद नव्हती. त्यामुळे या मैत्रिणीने खोलीजवळ जाऊन पाहिले असता तिला मृतदेह दिसला. याबाबत तिने वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांना माहिती दिली. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दरवाजा उघडून प्रवेश केला असता मृत विद्यार्थिनी जमिनीवर पडली होती. तिचा गळा आवळून हत्या झाली होती. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात गळा दाबूनच तिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. सकाळी पावणे पाचच्या सुमारास आरोपी सुरक्षा रक्षक वसतिगृहातून बाहेर पडल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसत दिसते.