मुंबई : दादर येथील सनदी लेखापाल भरत धनजी गाला (५९) यांची एक कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीने नामांकित कंपन्यांचे लेखापरिक्षणाचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून रक्कम घेतली. याप्रकरणी राजस्थानमधील जोधपूर येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद अक्रम अब्दुल सत्तार (२५) याच्याविरोधात भोईवाडा पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.

तक्रारीनुसार, जानेवारी २०२४ मध्ये मोहम्मद अक्रम अब्दुल सत्तार हा दादर (पूर्व) येथील गालांच्या कार्यालयात आला. त्याने स्वतःची ओळख जोधपूर येथील कंपनी सेक्रेटरी म्हणून करून दिली आणि आपले मोठे व्यावसायिक संबंध असल्याचे सांगितले. त्याने प्रफुल पटेल व रवी जैन यांचे नाव घेत, त्यांच्या मदतीने गालांना मोठे अकाउंटिंग प्रोजेक्ट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. अक्रमने पुढे सांगितले की जयपूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक आशिष अग्रवाल नवीन कंपन्या स्थापन करत आहेत आणि त्यांना चार्टर्ड अकाउंटंटची आवश्यकता आहे. त्यांच्या कौटुंबिक व्यवसायातील १११ कंपन्या त्यांच्या नावावर होणार आहेत. त्यामुळे गालांना मोठ्या आर्थिक संधी मिळतील.

असे सांगून आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने त्यांच्याकडून पैसे घेतले. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन गालांनी ऑनलाईन बँकिंग, गुगल पे आणि इतर डिजिटल माध्यमांतून एकूण एक कोटी ६४ लाख ५६ हजार ९४४ रुपये अक्रमने सांगितलेल्या खात्यामध्ये हस्तांतरीत केली. या रकमेसाठी त्यांनी बँकांकडून कर्ज घेतले, क्रेडिट कार्डचा वापर केला आणि मित्र व नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले. आता हे कर्ज फेडण्याचा तगादा त्यांच्यामागे लागला आहे. जेव्हा गालांनी पैसे परत मागितले तेव्हा अक्रमने २३ सप्टेंबर २०२४ नंतर पैसे परत देण्याचे आश्वासन दिले.

तसेच, सप्टेंबर ३०, २०२४ पर्यंत प्रत्येकी २० लाखांचे सहा धनादेश आणि ४५ लाखांचे हमीपत्र देण्याचे कबूल केले. मात्र, अद्याप ना धनादेश मिळाले ना पैसे मिळाले आहेत. त्यामुळे अखेर गालांच्या पत्नीने देखील अक्रमशी संपर्क साधून परतफेडीची विचारणा केली असता अक्रमने त्यांना धमकावले. अक्रमने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर भरत गाला यांनी मोहम्मद अक्रम अब्दुल सत्तार विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. भोईवाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५२, ३१८(४) व ३१६(२) अंतर्गत फसवणूक व फौजदारी विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Story img Loader