आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत वरळीच्या अ‍ॅनी बेझंट रोडवरल्या ‘नेहरू सेंटर’च्या इमारतीत (प्लॅनेटोरियमच्या लगतची उंच इमारत) तळमजल्यावर प्रशस्त आणि चित्र-शिल्पांसाठी भरपूर प्रकाशव्यवस्था असलेलं ‘नेहरू सेंटर कलादालन’ आहे. तिथं गेली किमान वीसेक र्वष, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ‘चातक’ नावाचं प्रदर्शन भरतं- चित्र/शिल्पकलांशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करून नुकतं कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्याच कलाकृती या प्रदर्शनात असतात. ‘जहांगीर आर्ट गॅलरी’देखील असंच पावसाळी विद्यार्थी-प्रदर्शन (मान्सून शो) भरवते; पण त्याआधी ‘चातक’मध्ये महाराष्ट्रातल्या कला महाविद्यालयांत सध्या काय चाललंय याची चुणूक पाहायला मिळते. एरवी ‘चातक’ हे प्रदर्शन जरा दाटीवाटीचं असतं.. २०हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग त्यात असतो- त्यामुळे चित्रं नीट पाहता येत नाहीत. यंदा हा सहभाग कमी (१५ विद्यार्थी) असल्यामुळे प्रदर्शनाला सुटसुटीतपणा आहे.

मुंबईच्या ‘जेजे’चे तसंच ‘एल. एस. रहेजा’ कला महाविद्यालयाचे प्रत्येकी तीन-तीन विद्यार्थी यंदा ‘चातक’मध्ये आहेत. सांगलीच्या ‘कलाविश्व महाविद्यालया’चे हर्षवर्धन देवतळे आणि औदुसिद्ध करजगी हे दोघे जण, कोकणातल्या सावर्डे येथील ‘सह्य़ाद्री कला महाविद्यालया’चा दुर्वास सागवेकर असे एरवी ‘जहांगीर’च्या मान्सून शोत न दिसणाऱ्या महाविद्यालयांतील विद्यार्थी ‘चातक’मध्ये आहेत. हेच वैशिष्टय़ पुण्याबाबत तर, ‘अभिनव’च्या दोघा आणि तीन (खासगी) आर्ट स्कुलांतल्या एकेका विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे अधोरेखित झालं आहे. या मजकुरासोबत छापलेलं ‘फलटण पॅलेस’ हे उजळ रंगांचं चित्र रंगवणारा अजय बोराटे पुण्याच्या ‘विश्वकर्मा क्रिएटिव्ह-आय कॉलेज’चा, तर कृतिका परुळकर तसेच रुपेश सोनार (अभिनव कला महाविद्यालय), अनुपम चौहान (भारती विद्यापीठ कला महाविद्यालय) आणि कामिल एफ. नदाफ हा ‘हिमगिरी कला महाविद्यालया’चा, असा पुण्याचा सहभाग आहे. ‘ठाणे स्कूल ऑफ आर्ट’ची बोस्की कपाडिया आहे. मुली कमी असण्यापेक्षा, शिल्पं कमी आहेत- ग्राफिक्स किंवा मुद्राचित्रं दिसत नाहीत, हे अधिक नजरेत येतं. यंदा ‘रहेजा’चा यशस पटेल हा एकमेव शिल्पकार ‘चातक’मध्ये आहे. ‘रहेजा’चे अमोल लोखंडे आणि सलमान शेख किंवा ‘जेजे’च्या संदीप शिंदे, अभिजीत पाटोळे, ललित सावंत यांची चित्रंच आहेत.

पाऊस झिमझिम आहेच.. पण ‘नेहरू सेंटर’कडे जाणाऱ्या बसही भरपूर आहेत.. तेव्हा ‘चातक’ पाहायचा; वाटल्यास कोपऱ्यावरल्या (लोटस पेट्रोलपंपाच्या पुढल्या) ‘ताओ आर्ट गॅलरी’तला चित्रसंग्रह पाहायचा आणि मग मुख्य रस्त्यावर येऊन हाजीअलीपर्यंतच्या रस्त्यावर समुद्राच्या काठानं पाऊस झेलत भटकायचं, यात अर्धी दुपार सहज कारणी लागेल!

विटक्या आयुष्यांचे रंग

बडोद्याचे राजू पटेल आणि जी. महेश हे दोघे चाळिशीतले चित्रकार सध्या मुंबईत प्रदर्शनरूपानं अवतरले आहेत. रीगल सिनेमाच्या चौकातल्या ‘सहकारी भांडार उपाहारगृहा’च्या समोरचं ‘क्लार्क हाऊस’ हे त्यांच्या गॅलरीचं ठिकाण. ही ‘क्लार्क हाऊस’ याच नावाची गॅलरी अगदी जुन्या वाटणाऱ्या (पण पांढऱ्या) अशा दुहेरी दरवाजाआड आहे. तिथं दिवाणखानावजा दालनात सिल्व्हिया लोपेझ हिची मांडणशिल्पं (इन्स्टॉलेशन) आणि अन्य कलाकृती पाहायला मिळतील. लिपस्टिकचे ओठ लागलेले पांढरेशुभ्र रुमाल आणि त्यांची काळीकुट्ट ‘निगेटिव्ह प्रिंट’ किंवा शोभेचे हत्ती आणि खोटे हस्तीदंत वापरून केलेलं मांडणशिल्प यांसारखी कामं नजरेत भरतात. समोरच्या भिंतीवरली ‘आय डोंट ब्लीड ब्लू’ ही अक्षरं वापरून केलेली कलाकृती किंवा महिलांवर येणाऱ्या बंधनांचं सिल्व्हियानं रस्त्यावरल्या वाहतूक-नियंत्रण चिन्हांसारखं दिसणारं केलेलं प्रतिमांकन, हे अस्वस्थ करतं. ते ओलांडून आपण पुढे जातो, तेव्हा आधी जी. महेश आणि वरच्या मजल्यावर राजू पटेल यांची चित्रं दिसतात. या दोघांनीही सामान्य जगण्यातल्या क्षणांवर स्वत:च्या मनांतल्या कथांचा हात फिरवून चित्रं साकारली आहेत. या कथांचा काळ ज्या क्षणात गोठला, तो क्षण म्हणजे चित्रं! रस्त्यावरल्या कुटुंबाचं दैनंदिन जीवन रेखाटणारं एक चित्र महेश यांनी केलं आहे. तर राजू पटेल यांची चित्रं (दृश्य-क्षण-कथांचीच असली तरी) रंगांच्या वैशिष्टय़ामुळे अधिक लक्षात राहतील. जलरंगांचं मिश्रण न करता, एकाच रंगाची बाह्य़रेषा काढून घेऊन पाण्यानं तो रंग आत पसरवायचा, असं तंत्र राजू पटेल यांनी वापरलं आहे. त्यामुळे चित्रांना हलकेपणा आणि आकृती भरीव असल्या किंवा आशय मांडणाऱ्याच असल्या तरीही त्यांच्यात पोकळपणा आला आहे, असं नजरेला भासतं. ‘बडोदा पॅम्प्लेट’ नावाचं अनियतकालिक चालवणारे आणि कलेतिहासाचं शिक्षण घेतलेले व्ही. दिवाकर यांनी या प्रदर्शनाचं विचारनियोजन केलं आहे.

याखेरीज ‘जहांगीर’, ‘एनजीएमए’, गेटवेकडे जाणाऱ्या रस्त्यावरल्या धनराज महल इमारतीतली ‘तर्क’ आर्ट गॅलरी, रेडिओ क्लबपासून कुलाबा कॉजवेकडे येणाऱ्या गल्लीतल्या ‘लकीरें’ आणि ‘साक्षी’ या गॅलऱ्या इथं काही ना काही पाहण्यासारखं आहेच.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chatak exhibition in nehru science center