गेल्या दशकभराहून अधिक काळ मुंबईवासीच असणारे मार्क प्राइम हे कला-प्रदर्शनांचे प्रकाशयोजनाकार आणि ‘एग्झिबिशन डिझायनर’ म्हणून अधिक परिचित आहेत. पण त्याआधी, मायदेशी ब्रिटनमध्ये असताना ते ड्रमसेट-वादक होते आणि इलेक्ट्रॉनिका या नव्या संगीतप्रवाहाशी त्यांचा संबंध होता. संगीतातल्या संकल्पनांवर आधारलेलं त्यांच्या मांडणशिल्पवजा कामाचं प्रदर्शन सध्या ‘चॅटर्जी अ‍ॅण्ड लाल’ या गॅलरीत भरलं आहे.

कुलाब्याला रेडिओ क्लबच्या अगदी जवळ, ‘कमल मॅन्शन’ या इमारतीच्या पहिल्याच जिन्यानं सरळ गेल्यावर या ‘चटर्जी अ‍ॅण्ड लाल गॅलरी’ची बेल हाताशी येते. ती वाजवल्यावर मोठ्ठं दार उघडतं, तुम्ही कोणीही असाल तरी प्रदर्शनाच्या माहितीचा कागद हाती दिला जातो आणि प्रदर्शन पाहायला तुम्ही मोकळे होता. इथं मार्क प्राइमनं घडवलेली ‘शिल्पं’ पाहायला आला असाल तर थोडी निराशा होईल. कारण इथं दिसतील ती धातूच्या जाड (परंपरागत आकाराच्या आकाशकंदिलाची कामटी जितकी जाड असायला हवी तितक्या जाड) तारा जोडून बनवलेली मांडणशिल्पं. झरझर एक फेरी मारली तरीही ती पाहून होतात. मग पुढे काय?

ही मांडणशिल्पं प्रकाशात ठेवून दिली आहेत. ती पुरेशी अमूर्त आहेतच. त्यामुळे ‘यात काय बघायचंय?’ असं अमूर्त चित्राकडे पाहून म्हणता येतं तसंच या कामाबद्दलही होईल. पण म्हणून त्यांच्याकडे पाहू नये, असं तर अजिबात नाही. उलट, हे कधी न दिसलेलं, नवं काही तरी जे आहे; त्याकडे पुन्हा नीट निरखून पाहून आपल्याला त्यातूनच आपण आधी पाहिलेल्या काही गोष्टी (उदाहरणार्थ इथे, रात्री वाहन आपल्यापासून दूर जाताना दिसणारी प्रकाशाची रेघ, छताच्या सांदीतून येणारी बारीक तिरीप इत्यादी) आठवू शकतात. पण हा अनुभव तेवढाच राहण्यापेक्षा आणखी पुढे जावा, अशी मार्क प्राइमची अपेक्षा आहे.

‘या भिंतीवर पाहा.. काडय़ा एकमेकांना जोडण्याची पद्धत अगदी एकसारखीच ठेवून बनवलेले, एकमेकांसारखेच अनेक आकार भिंतीवर मांडताना मात्र मांडणीची पद्धत बदलली आहे.. त्यातून संगीताचा प्रत्यय येतो मला’ – असं मार्क सांगतो, तेव्हा त्याची अपेक्षा कदाचित संगीत आणि चित्रकला या दोघांवर समान प्रेम करणाऱ्यांनाच पूर्ण करता येईल, असं लक्षात येतं. पण भिंतीवर मांडलेले ते अनेक आकार एकसारखे आहेत, हे नीट पाहिल्यास कुणालाही कळू शकतं!

‘भिंतीवर मांडलेले’ (‘टांगलेले’ नाही), असं म्हणण्याचं कारण आहे- मार्कच्या या शिल्परचनांमधल्या किमान तीन काडय़ा भिंतीतही आहेत आणि त्यांच्या आधारावर अख्खी एकेक रचना उभी आहे. काही शिल्पांबाबत, भिंतीऐवजी काळ्या गुळगुळीत पृष्ठभागाचा वापर केला गेला आहे. त्यात पृष्ठभागावर प्रतिबिंबंही दिसतात. फार त्रास होण्याजोगी नव्हे, पण दिसतात. यातून आणखी निराळा दृश्यानुभव येतो.

हे प्रदर्शन पाहून आपल्याला ते भिडणं, यात कदाचित काही अंतर असेल. पण ते अंतर नेमकं किती, हे स्वत:ला समजण्यासाठी तरी या प्रदर्शनाला मुद्दाम भेट द्यावी.

केजींचं संचित..

‘साक्षी गॅलरी’देखील पहिल्याच मजल्यावर आहे, तिथं मात्र दोन जिने चढून जावं लागतं आणि तिथंही बेल दाबावी लागतेच. या गॅलरीच्या अर्धपारदर्शक काचेच्या दरवाजाआड, थोर चित्रकार, कलाध्यापक आणि कला-चिंतक के. जी. सुब्रमणियन यांच्या अखेरच्या चित्रांचं प्रदर्शन सध्या लागलं आहे. चित्रांचा हा संच केजींनी स्वत:च्या हयातीत मुद्दाम प्रदर्शनासाठीच तयार केला आणि तो एका गॅलरीला न देता अनेक शहरांतल्या अनेक गॅलऱ्यांत हे प्रदर्शन लागावं, अशी तजवीज केली. तीनच महिन्यांपूर्वी, २९ जुलै २०१६ रोजी केजींचं निधन झालं.

काचेवर मागच्या बाजूनं रंगवलेली चित्रं आणि झरझर काढलेली ड्रॉइंग्ज ही केजींची खासियत या प्रदर्शनात पाहता येईल. आदिवासी कलेचा परिणाम केजींच्या चित्रांवर झालेला दिसतो तो कसा, हे या कामांमधून नवख्या प्रेक्षकालाही (जरा वेळ देऊन पाहिल्यास) जाणून घेता येईल. सहजता हा गुण आदिवासी कलेत दिसतो तसाच तो केजींकडे आहे, हे तर कुणालाही कळेल. रंगीत चित्रांमधले अनेक विषय आधुनिकच आहेत, तसंच एका चित्रातला एक पुरुष केजींसारखाच दिसतो, हेही काही जणांना समजेल. नाही समजलं, तरीही भारतीय कलेच्या इतिहासात अढळ स्थान मिळवलेल्या एका चित्रकारानं त्याच्या उतारवयात केलेली चित्रं कशी होती, हे डोळ्यांत साठवून घेणं अत्यावश्यक आहे.

..आणि जहांगीर’!

जहांगीर आर्ट गॅलरीत कुण्णालाही आवडतीलच, ती समिना सचक यांनी मांडलेली वन्यप्राण्यांची चित्रं! ती पाहण्यासाठी वरच्या मजल्यावर, ‘हिरजी जहांगीर गॅलरी’त जावं लागेल. सचक या टांझानियावासी आहेत, म्हणजे हे सारे प्राणी त्यांनी प्रत्यक्ष (कदाचित अनेकदा) पाहिलेले आहेत, हा तपशील त्यांच्या कौतुकात आणखी भर घालणारा आहे. चित्रकारांना किंवा कलाविद्यार्थ्यांना या चित्रांमधलं रंगकाम किती मोजूनमापून आणि किती व्यावसायिकरीत्या केलं गेलं आहे याबद्दल नापसंती व्यक्त करावीशी वाटेलच, पण इतरांनी मात्र अज्ञानातलं सुख घ्यायला काहीच हरकत नाही. ‘जहांगीर’च्याच आणखी एका भागात (प्रदर्शन दालन क्रमांक एक) मध्य प्रदेशातील प्रसिद्ध अमूर्तचित्रकार अन्वर यांच्या चित्रांचं प्रदर्शन आहे. पोत, रंगलेपनाचा जाड-बारीकपणा, अगदी हलके आकार, त्या आकारांतून होणारे कधी मोर तर कधी फ्लेमिंगोच्या मानेसारखे भास.. या साऱ्याचा एकसंध अनुभव आत्मरत शांततेचा असू शकतो.. अर्थात, तितकी उसंत तुम्हाला ‘जहांगीर’सारख्या गजबजलेल्या गॅलरीत मिळाली तर! ‘सभागृह दालन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जहांगीरच्या मुख्य दालनात प्रशांत नांद्रे, पिंकी वर्मा आणि शेखर रॉय यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन भरलं आहे.

Story img Loader