दृश्यसंस्कृती किंवा इंग्रजीत ‘व्हिज्युअल कल्चर’ म्हणजे खास, ‘आर्ट गॅलरीत कधीही न जाणाऱ्यांचा’सुद्धा प्रांत! त्यांनीच तर तो प्रांत वाढवलेला असतो.. कॅलेंडरं, फर्निचर, रोजच्या वापरातलं डिझाइन.. कोणत्याही धर्माच्या कोणत्याही देवादिकांची (पूजली जाणारी किंवा न जाणारी) नवीन रूपं.. लेणी किंवा उपासनास्थळांमधल्या चित्र/शिल्पांतून दिसणारी प्राणी/ देव/ दानव/ मानव यांची रूपं.. असं बरंच काही या दृश्यसंस्कृतीचा भाग बनतं, ते सामान्यजनांमुळेच. म्हणजे कुणी ‘कला’ म्हणून मोजू दे किंवा नको मोजू दे- दृश्यसंस्कृती असतेच आणि ती वाढतसुद्धा असते. पण याच दृश्यसंस्कृतीच्या इतिहासाचा अभ्यास मात्र कलेतिहासाचा भाग म्हणून करता येतो- अभ्यास म्हटलं की शिस्त आलीच आणि इतिहास जर खरोखरच अभ्यासायचा असेल, कलेच्या इतिहासलेखनातली भर जर अभ्यासातूनच घालायची असेल, तर उघडय़ा डोळ्यांनी सर्वत्र पाहून (१) आजची कला ही कोणकोणत्या ‘दृश्यसंस्कृती’ला प्रतिसाद देते आहे? त्यामागची कारणं काय असू शकतात? (२) कलेनं दृश्यसंस्कृतीकडून काय काय घेतलं? म्हणजे फक्त आकार-रंग हेच घेतलं की वैचारिकता किंवा मूल्यंसुद्धा घेतली? (३) कलेतून पुन्हा दृश्यसंस्कृतीकडे, असा उलटा प्रवास झालेला दिसतो का? – हे असं सगळं तपासून घ्यावं लागणार! ते करणं फार कमी जणांना शक्य असेल, हे उघड आहे. पण आपल्याला किमान या प्रश्नांची आपल्यापुरती उत्तरं मिळवण्याचा चाळा तरी करता यावा- त्यातून आपली बुद्धी (रोजच्या अनंत प्रश्नांपेक्षा खूप वेगळ्या आणि खूप छानसुद्धा) दृश्यसंस्कृती आणि कला यांच्या संबंधाबद्दलच्या प्रश्नपरिसावर घासली जावी, त्यातून आपल्यातलीच बावनकशी कलाप्रेमी प्रवृत्ती आपल्याला दिसावी, अशी संधी मुंबईतल्या एका छोटेखानी खासगी गॅलरीनं सध्या दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘चटर्जी अ‍ॅण्ड लाल’ हे त्या गॅलरीचं नाव. गेटवेचा समुद्रकाठ संपल्यावर कुलाब्याकडे जाणाऱ्या, ‘रेडिओ क्लब’च्या पुढल्या ‘कमल मॅन्शन’ या इमारतीत ही गॅलरी पहिल्या (किंवा अध्र्याव्व्याच!) मजल्यावर आहे. जिन्याला खेटलेल्या अजस्र लाकडी दाराची बेल दाबलीत, तरच गॅलरीत जाता येईल. तिथं मोठय़ा टेबलावर आणि आसपासच्या भिंतींवर लहान मुलांसाठी १९४२ ते १९४८ या काळात कुणा एका कंपनीनं जे फर्निचर बनवलं, त्यावरल्या छान छान गोड गोड चित्रांची मूळ रूपं पाहायला मिळतील, याच कंपनीच्या काही जाहिरातींतूनही फर्निचरची एकंदर ‘संस्कृती’ कशी पाश्चात्त्यधार्जिणी होती हे कळेल.. पण अगदी जुन्या- म्हणजे मौर्य आणि शुंग राजवटींच्या काळातल्या मुलांची मातीची खेळणीसुद्धा या प्रदर्शनात आहेत. प्रदर्शनाच्या मधोमध असलेला नटराज हा उत्तम कांस्य-कारागिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘चोल-काळा’तला आहे. या सुबक मूर्तीशेजारीच चटर्जी अ‍ॅण्ड लाल गॅलरीमध्ये नेहमी कलाप्रदर्शन करणारा तरुण शिल्पकार/ ‘परफॉर्मन्स आर्टिस्ट’ सहेज राहल याच्या ‘ताण्डव’ या परफॉर्मन्सचा व्हिडीओ पाहता येईल. आणखी पलीकडे, त्याच फर्निचर कंपनीसाठी त्याच चित्रकारानं बनवलेली काही ‘भारतीय’ डिझाइन्स ठेवलेली आहेत. आणि त्याही पल्याड, एकमेकांशी काटकोन साधणाऱ्या खोटय़ा भिंतींवर ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये १९३०च्या दशकापासून जगन्नाथ अहिवासी यांच्या अधिपत्याखाली जो ‘इंडियन आर्ट’चा अभ्यासक्रम सुरू होता, त्यातल्या विद्यार्थ्यांनी केलेली काही चित्रं दिसतील!

अहिवासींच्या वर्गातली ही चित्रं अजिंठय़ापासून ते केरळपर्यंतच्या अनेक भित्तिचित्रांच्या प्रेरणेतून तयार झाली होती, हे तर कोणत्याही खऱ्या संस्कृत्याभिमानी व्यक्तीला माहीत असतंच. विद्यार्थी ते विद्यार्थीच. विद्यार्थिदशेत- शिकत असताना त्यांनी काढलेली सर्वच्या सर्व चित्रं उत्कृष्ट नसणार, हे इथं प्रत्यक्षच दिसतं. एखादं चित्र तर जरा चुकतमाकत काढलेलंच वाटेल.. पण तरीही दस्तावेज म्हणून ते महत्त्वाचं आहे. पुढे भारतीय आकार आणि विचारांचा हा वर्ग सातत्यानं चालत असल्यामुळे त्यापुढल्या दशकभरात जे विचारांचं वारं मुंबईत वाहू लागलं, ते फर्निचर कंपनीसाठी ‘मुलांच्या फर्निचरवरली चित्रं’ करणाऱ्या चित्रकारापर्यंतही गेलं..

..त्या वेळचा तो तरुण चित्रकार म्हणजे उत्तरायुष्यात स्वघोषित संस्कृत्याभिमान्यांच्या रोषापायी, मरेपर्यंत स्वदेशाबाहेरच राहावं लागलेले मकबूल फिदा हुसेन.

हुसेन यांना मुलांच्या फर्निचरसाठी पाश्चात्त्य वळणाची चित्रं करण्यात अजिबात रस नव्हता. त्यांना भारतीय वळणाची चित्रं करायची होती. आपली ही प्रबळ इच्छा हुसेन यांनी एका सुहृदाला लिहिलेल्या पत्रात मांडलेली होतीच.. पण नुसतं इच्छा व्यक्त करून न थांबता हुसेन यांनी बालकांच्या फर्निचरसाठी काही भारतीय डिझाइन्स तयारसुद्धा केली!

समस्या एकच होती. मुळात त्या काळी मुलांसाठीच निराळी खोली, त्यांच्यासाठी ‘नॅनी’ – त्यांच्यासाठी वयानुरूप बेड/ टेबलखुर्ची आदी फर्निचर.. वगैरे असल्या जीवनशैलीचा अंगीकार करणारे लोक हे पूर्णत: आंग्लाळलेले/ पाश्चात्त्यधार्जिणे असेच असत. त्यांना मौर्य-शुंग काळातली ती मातीची खेळणी मागासच वाटणार, हे उघड होतं.. १९४२ पासनंच छान डिस्नेच्या त्या वेळच्या चित्रपटांतलं डिझाइन फर्निचरवर मिळत असताना भारतीय चित्रं कशाला घेतील ते?! हेच हुसेन यांना कामावर ठेवणाऱ्या ‘फँटसी’ या कंपनीनंही ओळखलं होतं. तरीही भारतीय प्रतिमासृष्टीवरलं तरुण मकबूलचं प्रेम इतकं प्रबळ की, यानं धन्याच्या इच्छेविरुद्ध जाऊन भारतीय डिझाइन्स तयार केलीच!

हे तर काहीच नाही- ‘बच्चों के बापू’ असं- बालक, बालिका आणि गांधीजी चालत आहेत अशा दृश्याचं- एक डिझाइन हुसेननं तयार केलं आणि कंपनीपुढे ठेवलं.

अखेर या कंपनीशी हुसेनचे संबंध गोडीगुलाबीत संपले. धन्यानं हुसेन चित्रकार म्हणून चांगलाच आहे, त्याला फार नव्या कल्पना सुचतात वगैरे प्रशस्तिपत्रही दिलं.

याच हुसेननं पुढे काँग्रेस, भाजप आदी राजकीय पक्षांपासून ते ‘घाशीराम कोतवाल’ या मराठी नाटकापर्यंत, मदर तेरेसांपासून ते गणपती, सरस्वती, दुर्गा इथपर्यंत.. इतकंच कशाला – ‘कंदील’ आणि ‘छत्री’ यासारख्या आसेतुहिमाचल भारतीय संस्कृतीचाच भाग झालेल्या अनेक वस्तूंच्यासुद्धा- अशा भारतीय प्रतिमा स्वत:च्या चित्रांमध्ये आणल्या. ‘हुसेनची निर्मिती भारतीय प्रतिमांवर आधारित असली, तरी ती स्वतंत्र आहे’ हे तत्कालीन चित्ररसिकांनी समजून घेतलं, म्हणून तर हुसेन हे चित्रकार म्हणून मोठे होऊ शकले.

पुढे कधीतरी- म्हणजे १९९२ सालच्या डिसेंबरानंतर तीन वर्षांनी, मुंबईच्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर दोन वर्षांनी, असं कधीतरी- ही समज संपून गेली. आमची दृश्यसंस्कृती स्वीकारायची असेल तर तिच्यातल्या भक्तिभावासकट आणि पूजनीयतेसकट स्वीकारा, अशी अपेक्षा ठेवणाऱ्यांची संख्या चित्ररसिकांपेक्षा तरी नक्कीच वाढली.. हे सारं प्रदर्शन पाहतानाही कदाचित आठवेल.

इथं नटराज आणि सहेज राहलच्या ‘ताण्डव’ या व्हिडीओकडे पुन्हा लक्ष जातं.

सहेज राहलनं नेसलेलं धोतर शेजारच्या मूर्तीत दिसणाऱ्या वस्त्रांपेक्षा अधिक जास्त आहे. सहेज राहलच्या अंगावर उत्तरीयासारखं काहीतरी दिसतंय. त्यानं तर डोकंसुद्धा बोडकं ठेवलेलं नाहीये. ‘नग्नता नको- कमी कपडे नकोत’ हा जर सांस्कृतिक विचार असेल, तर त्यानं तो तंतोतंत पाळलाय. पुन्हा हे ताण्डव त्यानं टय़ूबलाइटसारखं काहीतरी हाती घेऊन केलंय. म्हणजे कोणत्याही शस्त्राचा, कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही प्रतीकाचा अपमान होण्याचा संभवच नाही.

‘ताण्डव’ हे त्याच्या या कला-कृतीचं नाव का आहे? तर मुळात ही कृती मला नटराजाच्या मूर्तीवरून, शिवाच्या ताण्डवमुद्रेवरून सुचली, असा नम्रभावच त्यात आहे. शिव अथवा कोणत्याही अन्य दैवताचा अवमान न करता जे काय काय करता येईल, ते सहेज करतोच आहे.

‘कलेनं दृश्यसंस्कृतीकडून काय काय घेतलं? म्हणजे फक्त आकार-रंग हेच घेतलं की वैचारिकता किंवा मूल्यंसुद्धा घेतली?’ या प्रश्नावर प्रत्येकाची मतं निरनिराळी असतील. पण म्हणूनच एकदा या गॅलरीत, ते सारं पाहून या प्रश्नावर विचार करावा.. आर्ट गॅलरी म्हणजे काही मतदानकक्ष नाही किंवा राजकीय मैदान नाही. इथं तर कला आणि दृश्यसंस्कृती यांच्या अंत:संबंधांचा इतिहास कसा घडला एवढंच मांडलं आहे.. त्यामुळे आपापली घट्ट राजकीय मतं इथं बाजूला ठेवता येतील! पण तरीही कदाचित काही जणांना, ‘दृश्यसंस्कृतीतून कलेनं काय आणि कसं घ्यावं, हे त्या-त्या काळचे राजकीय/ सामाजिक घटक ठरवतात का?’ असा नवाच प्रश्नही पडेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chatterjee and lal gallery mumbai