वसरेवा- अंधेरी- घाटकोपर या मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेमार्गावरील वसरेवा ते विमानतळापर्यंतचा पहिला टप्पा सुरू होण्याची कसलीही लक्षणे नसताना मेट्रोच्या नियोजित प्रवासी भाडय़ाचे दर वाढवण्याचा तगादा ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ने लगावला आहे. त्यामुळे वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा अन्यथा प्रसंगी मेट्रो रेल्वे ताब्यात घेण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. त्याचबरोबर चारकोप- वांद्रे- मानखुर्द या दुसऱ्या मेट्रोचा ‘रिलायन्स’सोबतचा करारही रद्द होण्याची चिन्हे आहेत.
या मेट्रोच्या प्रवासी भाडय़ात वाढ करण्यासाठी ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या अखत्यारितील ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’ने तगादा लावला आहे. सहा ते १३ रुपये या दरपत्रकाऐवजी १८ ते ३४ रुपये प्रवासी भाडे ठेवावे, अशी मागणी ‘रिलायन्स’कडून करण्यात येत आहे. पण अशी दरवाढ मागणे योग्य नाही आणि ती मंजूर करणे राज्य सरकारला शक्य नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. वाटाघाटी करून प्रश्न सोडवणे किंवा हा प्रकल्प राज्य सरकारने ताब्यात घेणे असे दोनच पर्याय या परिस्थितीत शिल्लक उरतात, असे नमूद करत ‘रिलायन्स’ राबवत असलेला मुंबईतील पहिला मेट्रो रेल्वे प्रकल्प प्रसंगी ताब्यात घेण्याचा अप्रत्यक्ष इशाराच मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिला.
चारकोप- वांद्रे- मानखुर्द या ३२ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या मेट्रोचे कामही ‘रिलायन्स’लाच देण्यात आले आहे. पण पर्यावरण परवानगीमुळे कारडेपोसाठी जागा मिळत नसल्याने प्रकल्प चार वर्षांपासून रखडला आहे. तो मार्गी लागण्याची कसलीही चिन्हे नाहीत. त्याबाबत विचारणा करता, पर्यावरण परवानगी मिळत नसेल तर दुसऱ्या मेट्रोच्या कामासाठी ‘रिलायन्स’सह झालेला करार तोडण्याशिवाय पर्याय उरत नाही, असेही संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. अशा परिस्थितीत सुरक्षा ठेवबाबतच्या ४०-५० कोटी रुपयांच्या रकमेचे काय करायचे? सरकारने ती द्यायची काय? असे प्रश्न निर्माण होतात. त्यावर मार्ग काढता येतो, असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे वरळी-हाजी अली सागरी सेतूप्रमाणेच ‘रिलायन्स’ला दुसऱ्या मेट्रोवरही पाणी सोडावे लागणार असे संकेत मिळत आहेत.
याबाबत ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
मुहूर्त हुकणार
वसरेवा- अंधेरी- घाटकोपर या मेट्रो रेल्वेमार्गाची एकूण लांबी ११.४० किलोमीटर आहे. २००६ मध्ये काम सुरू होऊनही अद्याप प्रकल्प पूर्ण झालेला नाही. वसरेवा ते विमानतळापर्यंत पहिल्या टप्प्यात सप्टेंबर २०१३ मध्ये प्रवासी सेवा सुरू करण्याचा मुहूर्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १ मे रोजी मेट्रोच्या चाचणीवेळी जाहीर केला होता, पण तोही हुकणार आहे. मेट्रो रेल्वेची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे, असे सांगत मेट्रो कधी धावणार याचा निश्चित मुहूर्त सांगण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे मेट्रो कधी धावणार याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा