मुंबई : अंधेरी कुर्ला मार्गावर जरिमरी परिसरात रविवारी दुपारी अचानक कच्चे बांधकाम असलेली एक छोटी चाळ जमीनदोस्त झाली. एकावर असे मजले चढवलेली चार ते पाच घरे या दुर्घटनेत कोसळली. या दुर्घटनेत तीन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कुर्ला पश्चिमेकडे राधा नगर चाळीत ही दुर्घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. एकमेकांना खेटून असलेल्या एकमजली झोपड्यांची ही चाळ अचानक दुपारी कोसळली. विटांचे बांधकाम आणि पत्र्यांचे छप्पर असलेली ही निवासी चाळ पूर्णत: जमीनदोस्त झाली. दुर्घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्य हाती घेतले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन महिलांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यात तिघीही जखमी झाल्या असून त्यांच्यावर साकीनाका येथील पॅरामाऊंट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – मुंबई : पावसाचा जोर वाढल्याने वाहतूक सेवेवर परिणाम, कर्जत-चौक दरम्यान रेल्वे सेवा ठप्प
हेही वाचा – मुंबईत आतापर्यंत सरासरीच्या ४५ टक्के पाऊस, गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस
अफ्रीन शेख (२५), रसिका नाडार (३५) आणि एक्स्टर नाडार (६७) असे या तीन महिलांची नावे आहेत. अफ्रीन हिच्या चेहऱ्याला व मानेला दुखापत झाली आहे. तर अन्य दोघींच्या शरीरावर जखमा असून त्यांना मुकामारही लागला आहे. तिघींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.