‘लोकसत्ता’ हे वृत्तपत्र १९९० च्या दशकाअखेरीस पहिल्यांदा रंगीत झालं, त्याची मांडणी रेखीव झाली, त्यानंतरच्या जाहिरातीतलं महत्त्वाचं वाक्य होतं : ‘‘आधी डोळे भरून पाहावा.. मग मनसोक्त वाचावा’’! ते आजही खरंच असलं तरी, ती जुनी जाहिरात आता काही थोडय़ांनाच आठवते हे अधिक खरं. पण हे असंच्या असंच वाक्य पुन्हा सुचावं, असं एक प्रदर्शन सध्या मुंबईत भरलंय.
हे प्रदर्शन आहे कलावंतांनी काढलेल्या अ-नियतकालिकांचं तसंच कमी पानांच्या सुटसुटीत पुस्तकांचं. या प्रकाशनांचं वैशिष्ट य़ म्हणजे ती अनौपचारिक आहेत, ‘अधिकृत’ किंवा ‘प्रकाशनविश्वातली’ नसून एकटय़ादुकटय़ा माणसांनी किंवा कलासमूहांनी, कला आणि समाज यांची सांगड घालू पाहणाऱ्या संस्थांनी ती काढलेली आहेत. याला इंग्रजी प्रतिशब्द ‘झाइन’ (‘मॅगेझीन’च्या स्पेलिंगची अखेरची चार अक्षरं). मुंबईकर कला-कार्यकर्ते एस. हिमांशु आणि अक्वी थामी यांच्या ‘बॉम्बे अंडरग्राउंड’ संस्थेनं वेळोवेळी ‘ए-फाइव्ह’ नावाचं अ-नियतकालिक काढलं. त्याचे पुस्तिकावजा अंक इथं आहेत, तसंच परदेशांतल्या ज्या मित्र-संस्थांनी त्यांना इथं आपापली पुस्तकं विकण्याची परवानगी दिली, त्यांचीही पुस्तकं वा अ-नियतकालिकं आहेत. अशी एकंदर ७० हून अधिक ‘झाइन’ इथं पाहाता येतात. तिथंच बसून वाचता येतात किंवा त्यापैकी काही झाइन विकतही घेता येतात. ही झाइन आधी डोळे भ्रून पाहावीत, मग मनसोक्त वाचावीत.. पण हे प्रदर्शन काही एवढय़ावरच थांबणारं नाही!
झाइन काढणारे लोक फक्त चित्रकार म्हणून चार पैसे कमवावेत अशा वृत्तीचे नसतात. ते काहीसे भंजाळलेले, पण सृजनशील कार्यकर्ते असू शकतात. या झाइन-संस्कृतीची ओळख करून देणारे किंवा त्या संस्कृतीचा भाग म्हणून साकारण्यात आलेले काही व्हीडिओ-पट इथल्या दोन पडद्यांवर दिसतात. त्याखेरीज गॅलरीच्या मधोमध एक टेबल आहे. कशासाठी हे टेबल?
इथं तीन विषय दिले आहेत : ‘लहानपणीचं खेळणं’ पासून ते ‘ऑर्वेलचं ‘अॅनिमल फार्म’’ इथवरचं वैविध्य असलेले विषय. त्यापैकी एखाद्या विषयावर तुम्ही तुमच्या कल्पनेप्रमाणे चित्र काढायचं. हवं तर, हे चित्र असं का आहे, किंवा तुम्हाला त्याबद्दल आणखी काय सांगावं वाटतं, ते लिहायचं. मग हिमांशु आणि अक्वी तुमचंही चित्र गॅलरीत लावणार आणि तुमच्याही नकळत तुम्हाला ‘झाइन संस्कृती’चे शिलेदार करणार!
अनुभव एरवीपेक्षा निराळा, म्हणूनच प्रदर्शन पाहा- वाचा- सहभागी व्हा. ‘चटर्जी अँड लाल गॅलरी’ मध्ये हे प्रदर्शन आहे. गेटवे ऑफ इंडियाचा समुद्रकाठ संपल्यावर जो ‘रेडिओ क्लब’लागतो, तिथून कुलाबा कॉजवेकडे (शहीद भगतसिंग मार्गाकडे) येताना डाव्या हाताला ‘कमल मॅन्शन’ नावाची अनेक प्रवेशदारांची इमारत लागते. तिच्या (रेडिओ क्लब दिशेच्या) पहिल्याच प्रवेशदारातनं आत गेल्यावर, पहिलाच जिना संपतासंपता या गॅलरीच्या मोठ्ठय़ा लाकडी बंद दाराची बेल दिसेलच. ती दाबल्यावर आत तुमचंही राज्य आहे.. तुमच्या कल्पनाशक्तीचं राज्य!
अन्यत्र..
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातलं (पूर्वीचं प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम) एकमेव मोफत दालन असलेल्या ‘कुमारस्वामी हॉल’मध्ये ‘शिल्पकारांची चित्रं’ असं एक प्रदर्शन भरलं आहे. प्रदर्शनात अनेक नव्या-जुन्या शिल्पकारांनी प्रामुख्यानं कागदावर केलेलं ड्रॉइंगवजा काम प्रदर्शिक झालं आहे. यापैकी अनेक शिल्पकारांच्या ड्रॉइंगमध्ये अवकाश-निर्मितीची आस दिसते. प्रचंड आकाराची काळी शिल्पं करणाऱ्या एम. शान्तामणि यांची काही ड्रॉइंग्ज इथं आहेत, त्यांत प्रचंडपणा आणि सूक्ष्मपणा या दोन्हीचा विचार दिसतो.
‘जहांगीर’ च्या सलग तीन दालनांमध्ये अनुक्रमे प्रभु जोशी, व्ही. व्ही. रामाणी आणि सुरेन्द्र चावरे यांची चित्रं आहेत. यापैकी रामाणी यांनी चिकटचित्र (कोलाज) प्रकारात काम केलं आहे. ही चित्रं प्रथमदर्शनी काहीशी भडक किंवा उग्र वाटतील.
कवी, संपादक, अभिनेत्री..
मनीषा रा. पाटील या कवी. मंगेश काळे हे ‘खेळ’ या कविताविषयक नियतकालिकाचे संपादक. नीलकांती पाटेकर या अभिनेत्री म्हणून सुपरिचित. या तिघांचा, तसंच कोलकात्याचे चित्रकार सुब्रत साहा आणि चित्रकार व पहाडी लघुचित्रांचे संशोधक-अभ्यासक बलबिंदर कुमार कांगडी यांचा समावेश असलेलं प्रदर्शन वरळीला (प्लॅनेटोरियमनजीक) नेहरू सेंटरच्या मोठय़ा आयताकार गॅलरीत महाराष्ट्रदिनापर्यंत सुरू राहणार आहे. मनीषा यांची रंगचित्रं, मंगेश यांनी मोठमोठय़ा कॅनव्हासवर केलेली आणि रंगांपेक्षा रेषांना महत्त्व देणारी- रेषावलयांतून कल्पनांचे खेळ प्रेक्षकाला खेळू देणारी चित्रं, तसंच नीलकांती यांनी सिरॅमिक्ससारख्या साधनातही शिल्पकलेप्रमाणे केलेलं मानवाकृतीप्रधान काम, हे पाहण्यासाठी नेहरू सेंटरमध्ये जायला हवं.