जुहू येथील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जमनाबाई नरसी आणि उत्पल संघवी या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देतो, असे सांगून तब्बल २० पालकांची फसवणूक करणाऱ्या २७ वर्षे वयाच्या तरुणाला अटक करण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. त्याच्याकडून जमनाबाई नरसी विद्यालयाचे कोरे अर्ज तसेच अनेक विद्यार्थ्यांचे तसेच पालकांची छायाचित्रे, विविध दाखले, शिधावाटप पत्रिका, आधारकार्ड, पासपोर्टच्या प्रती हस्तगत करण्यात आल्या आहेत.
मेहफूझ जकी अहमद शेख असे या तरुणाचे नाव आहे. केवळ दहावीपर्यंत शिकलेल्या शेखने आणखीही काही पालकांना गंडा घातला असावा, असा पोलिसांना अंदाज आहे. या दोन्ही शाळांमध्ये प्रवेशासाठी येणाऱ्या पालकांना तो आपले ग्राहक बनवित असे. या शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालक वाट्टेल ती रक्कम देण्यास तयार असल्याचा तो फायदा उठवीत होता. मनधीर चिटणवीस यांना त्यांच्या मुलासाठी नर्सरीत  प्रवेश हवा होता. त्यामुळे त्यांनी शेखला मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, त्याने प्रवेशासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. प्रवेशासाठी आवश्यक ती कागदपत्रे आणि दीड लाख रुपये घेऊन चिटणवीस जुहू येथील जमनाबाई नरसी शाळेजवळ आले. सदर तरुणाने कागदपत्रे आणि रोकड ताब्यात घेतली. प्रवेश मिळाल्याबाबतचे पत्र आणून देतो, असे सांगून त्याने पोबारा केला. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र शेखचा शोध घेण्यात पोलिसांना यश येत नव्हते. शाळा प्रवेशाच्या नावाखाली फसवणुकीची आणखी काही प्रकरणे घडू नयेत, यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने हा तपास आपल्याकडे घेतला. अंधेरी युनिटचे वरिष्ठ निरीक्षक दीपक फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योत्स्ना रासम, महादेव निंबाळकर, मिलिंद देसाई, सुनील माने आदींच्या पथकाने सापळा रचून वांद्रे पूर्व येथून शेखला अटक केली. दहावीपर्यंत शिकलेल्या शेखने २० पालकांची फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे, असे सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी सांगितले.