राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे विविध गुन्हे दाखल होत असतानाच शनिवारी त्यांच्या विरोधातील फसवणुकीचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले. भुजबळ कुटुंबियांच्या मालकीच्या देविशा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीतर्फे खारघर येथे ‘हेक्स वर्ल्ड सिटी’ हा विशाल गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र तो ज्या जागेवर आहे त्याचा ताबा वा त्यासंबंधीच्या परवानग्या या कंपनीकडे नाहीत; तरीही तेथील सदनिका विकण्यात आल्या व त्यापायी घर खरेदीदारांकडून सुमारे ४५ कोटी रुपये घेण्यात आल्याची तक्रार करण्यात आली असून, या प्रकरणी पंकज व समीर भुजबळ यांच्यासह कंपनीच्या अन्य तीन संचालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ट्रॉम्बे येथील एका रंगकाम कंत्राटदाराने याबाबतची तक्रार दिली आहे. पनवेल तालुक्यातील मौजे रोहिंजण येथील सव्र्हे क्रमांक ९१/१ शेजारील २५ एकर जागेवर हेक्स वर्ल्ड सिटी गृहप्रकल्प देविशा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी उभारत आहे. खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ जवळच हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात तीन हजार ३४४ सदनिकाधारकांनी २००९मध्ये नोंदणी केली. त्यांच्याकडून घराच्या किमतीच्या आठ टक्के रक्कम देविशा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने आगाऊ घेतली. तीन वर्षांत घरे बांधून देतो असा वायदा कंपनीने केला होता. मात्र अद्याप या प्रकल्पातील कोणत्याही घराचा ताबा देण्यात आलेला नाही. मुळात ज्या जागेवर हा प्रकल्प बांधण्यात येत आहे ती जागाही अजून देविशा कंपनीच्या ताब्यात नाही, असा घर खरेदीदारांचा आरोप आहे. तसेच गृहप्रकल्पाला आवश्यक काही शासकीय परवानग्याही अजून घेतलेल्या नाहीत. त्याचबरोबर सदनिकेच्या रकमेचे करारपत्रही देविशा कंपनीने केले नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच संतप्त खरेदीदारांनी पोलिसांत धाव घेतली. देविशा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे पंकज भुजबळ, समीर भुजबळ, माधव धारप, सायन अप्पा केसरकर, अमित बलराज हे भागीदार आहेत. हेक्स वर्ल्ड सिटीची जागा देविशा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या किंवा भुजबळ कुटुंबीयांच्या नावावर नाही, असा दावा या सिटीमधील गुंतवणूकदारांनी केल्याने व तसे पुरावे पोलिसांना दिल्याने भुजबळ कुटुंबीय अडचणीत आले असून, तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. क्र. ५९/२०१५) नोंदविण्यात आला आहे. जागा नावावर नसताना हजारो घर खरेदीदारांकडून सदनिकांसाठीची रक्कम का स्वीकारण्यात आली याचा तपास पोलीस करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा