मुंबई : यश बिल्डर्सचे विकासक पारस सुंदरजी देढिया यांना सोमवारी उच्च न्यायालयाच्या आवारातून अटक करण्यात आली आणि न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. देढिया यांना अटकेनंतर आर्थर रोड कारागृहात नेण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेंबूर आणि गोवंडी येथील पुनर्विकास प्रकल्पांमधील अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने २२ डिसेंबर २०२३ रोजी देढिया यांच्याविरुद्ध अवमानप्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होते. वारंवार समन्स आणि जामीनपात्र वॉरंट बजावूनही देढिया हे उपस्थित न झाल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. न्यायालयात लेखी आश्वासन देऊनही त्याचे देढिया यांनी पालन केले नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधात अवमान याचिका करण्यात आली होती.

हेही वाचा…जनतेनेच निवडणूक हातात घ्यावी; १९७७ चा दाखला देत ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन

चेंबूरमधील मालमत्तेच्या पुनर्विकासाबाबत मालमत्तेचे मालक दिलीप गावंड यांनी देढिया यांच्या कंपनीशी २०१४ मध्ये करार केला होता. त्यानुसार, यश हाइट्स आणि यश सिग्नेचर हे दोन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले. रहिवाशांनी जागा रिकामी केल्यानंतर इमारतीही पाडण्यात आल्या. गावंड यांना यश सिग्नेचर मध्ये ८०५ चौरस फूटांच्या दोन सदनिका मिळणार होत्या.

परंतु विकासक प्रकल्प पूर्ण करण्यात आणि ताबा देण्यात अयशस्वी ठरल्याने, गावंड यांनी २०१७ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या वेळी अटींचे पालन करण्याची लेखी हमी देढिया यांनी न्यायालयाला दिली होती; परंतु त्याचे पालन केले नाही. गावंड यांचा ११ मे २०२० रोजी मृत्यू झाला. त्यांनी दाखल केलेला दावा त्यांच्या पत्नी आणि मुलाने पुढे नेला.

हेही वाचा…राज्य शासनाच्या ‘गतिमान कारभारा’चे दर्शन! तक्रारीनंतर अवघ्या आठ दिवसांत रश्मी बर्वे यांची जात वैधता रद्द

कारवाई करण्याचे कारण…

या प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी, देढिया रविवारी रात्री उशिरापर्यंत अटक टाळत असल्याचे आणि त्यांनी भ्रमणध्वनीही बंद ठेवल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. या वेळी देढिया न्यायालयात हजर झाले. पोलीस यंत्रणा कारवाई करत असतानाही देढिया यांनी जाणूनबुजून अटक टाळण्याचा प्रयत्न केला. शिवाय, न्यायालयाला दिलेल्या हमींचे उल्लंघन केले आणि न्यायालयात उपस्थित राहणे टाळले. आताही, देढिया न्यायालयात उपस्थित आहेत. परंतु त्यांच्याकडून माफी मागितली गेलेली नाही किंवा हमीच्या उल्लंघनाचे स्पष्टीकरण दिले गेलेले नाही. त्यामुळे देढिया यांच्या या कृतीला आळा घालणे गरजेचे असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने त्यांना अटक करण्याचे आदेश दिले. तसेच अवमानप्रकरणी तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.