मुंबईः जाहिरातीसाठी २५ कलाकारांना बोलवून त्यांच मानधन बुडवून सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या जाहिरातीसाठी अभिनेत्री अंकिता लोखंडे, आयुष शर्मा, आद्रीजा रॉय यांच्यासह २५ कलाकारांना बोलवण्यात आले होते. सेलेब्रीटी मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंधेरी (प.) येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार रोशन बिंदर (४८) यांची आयमन इंटरटेन्मेट नावाची कंपनी असून ते कार्यक्रम व जाहिरातीसाठी सेलेब्रीटी उपलब्ध करून देण्याच काम करतात. त्यांना जुलै २०२४ मध्ये एका व्यक्तीने दूरध्वनी केला होता. एनर्जी ड्रींकची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या जाहिरातीसाठी २५ कलाकारांचीआवश्यकता असल्याचे त्याने बिंदर यांना सांगितले. बिंदर यांनी होकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना १० लाख रुपये आगाऊ पाठवल्याची पावती पाठवली. पण तक्रारदारांच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा झाली नाही. त्यानंतर आरोपीने तक्रारदाराला दादर येथील पार्टीमध्ये कलाकारांना आणण्यास सांगितले.

अर्जुल बिजलानी, अभिषेक बजाज, हर्ष राजपुत यांच्यासह १०० कलाकार तेथे पोहोचले. आरोपींनी त्यापैकी २५ कलाकारांची जाहिरातीसाठी निवड केली. त्या सर्वांचे मिळून एक कोटी ३२ लाख रुपये मानधन ठरवण्यात आली. त्यासाठी तक्रारदाराला १५ लाख रुपयांच्या धनादेशाचे छायाचित्र पाठवण्यात आले. ती रक्कम खात्यात जमा होईल, असे सांगण्यात आले. धनादेशाचे छायाचित्र पाहून तक्रारदाराने कलाकारांसोबत रिल्स बनवण्याचे काम सुरू केले. त्या समाज माध्यमांवर अपलोड झाल्यानंतर ३५ दिवसांत सर्वांचे पैसे दिले जातील असे ठरले होते. त्यावेळी दादर येथील पार्टीत सहभागी झालेल्या कलाकारांना दोन लाख व ९० हजार रुपयांचे दोन धनादेश देण्यात आले होते.

ते वठले नाही. त्यावेळी एका आरोपीशी संपर्क साधला असता त्याने आपण दुबईत असून येथील चलनानुसार २२ लाख ५० हजार रुपये तक्रारदार महिलेला पाठवल्याचे सांगितले. पण दोन दिवस झाले, तरी ती रक्कम तक्रारदार महिलेच्या खात्यावर जमा झाली नाही. तक्रारीनुसार, आरोपींनी सिने कलाकार तेजस्वी प्रकाश यास दिलेला साडेसहा लाखांचा व अद्रीजा रॉय हिला दिलेला सव्वा लाखांचा धनादेशही वठला नाही. त्यनंतर आरोपीने १८ ऑक्टोबर २०२४ रोजी तक्रारदारांच्या कंपनीच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी ३५ लाख व ४५ लाख रुपयांचे दोन धनादेश तयार केले. ती रक्कम दोन दिवसांत जमा होईल, असे सांगितले.

त्यामुळे तक्रारदार महिलेने कलाकार जय भानुशाली, भूमिका गुरांग, अंकिता लोखंडे, आयुश शर्मा, सना सुलतान, कुशल टंडन, आद्रिजा रॉय, बसिन, अभिशेक बजाज यांना त्यांच्या कामाची आगाऊ रक्कम म्हणून ३५ लाख रुपयांचा धनादेश दिला. पण आरोपीने दिलेला ८० लाखांचा धनादेश वठला नाही. त्यामुळे तक्रारदार महिलेने कलाकारांना दिलेले धनादेशही वठले नाही. अशा प्रकारे कलाकारांसाठी ठरलेले एक कोटी ३२ लाख व तक्रारदार महिलेची १६ लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक झाली, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशातील रहिवाशासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader