केमोल्ड ही दक्षिण मुंबईतली प्रशस्त गॅलरी. इथं एकटय़ानं (सोलो) प्रदर्शन करणं प्रतिष्ठेचं आणि तेवढंच आव्हानाचंही.. कारण गॅलरीचा आकार प्रचंड; त्यात भरायचं काय काय? प्रदर्शनाची म्हणून एक रचना असली पाहिजे, गॅलरीतल्या निरनिराळय़ा जागांची लय प्रदर्शनात भिनली पाहिजे, या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर ‘केमोल्ड’मधलं कुणाही कलावंताचं प्रदर्शन विसविशीत वाटू शकतं. पण इथली बहुतेक प्रदर्शनं- गेल्या दहा वर्षांतले एकदोन अपवाद वगळता- या कसोटीस उतरतात. आश्चर्य असं की, माधवी सुब्रमणियन यांच्या सिरॅमिक-शिल्पांचे विषय निरनिराळे असूनही सध्या ‘केमोल्ड’मध्ये लागलेलं या कलाकृतींचं प्रदर्शन एकजीव अनुभव देतं! आत शिरताच डाव्या हाताला टेराकोटा मातीतून माधवी यांनी आणि ठरावीक वेळेत इथं येणाऱ्या कोणाही प्रेक्षकानं घडवलेल्या शिल्पांचा समूह दिसेल. ही शिल्पं झाडांची आहेत. शहरांमध्ये हिरवाईची बेटं असतात, तसंच या शिल्पसमूहांना एक आखीव मर्यादा आहे. पण त्या क्षेत्राच्या आत झाडांची संख्या वाढत जाते आणि जंगल दाट होत जातं. असे एक-दोन नव्हे, पाच शिल्पसमूह गॅलरीच्या याच खोलीवजा भागात आहेत. त्यांच्यामधून फिरताना झाडांचे आकार जाणवत राहतात. हिरवा रंग इथं कुठंच नसूनही (त्याऐवजी फक्त मातकट रंगांच्या फांद्या असूनही) अनेक झाडांची आठवण येते. पुढे, एका रस्त्यावरल्या झाडांच्या सावलीची छायाचित्रंही माधवी यांनी एका सलग पट्टीत मांडली आहेत. छायाचित्रातून दिसणारी, नेहमीच्या अनुभवाला निराळेपण देण्याची माधवी यांची हातोटी समोरच्या भिंतीवरल्या दुसऱ्या- पांढऱ्याधोप गोवऱ्यांसारख्या आकारांतूनही जाणवते. पण जरा वळलात की भिंतीवर नीटस वर्तुळाकारात, काळ्यापांढऱ्या छोटय़ा शंकूंतून ‘उत्पत्ती’ची संकल्पना मांडली आहे. उत्पत्ती आहे तिथं विलय आलाच. हा खेळ आपल्या स्मृतींमध्ये सुरू असतो. स्मृतीच कशाला, क्षणोक्षणी विचारांचा किंवा भावनांचा खेळ मनात सुरू असतोच. प्रेम, ध्येय यांसारख्या काही संज्ञा त्यात पुन्हापुन्हा येतात. हे संज्ञात्मक शब्द वाळूवर उमटवण्याचा खेळ पुढल्या भागात माधवी यांनी मांडला आहे. खोलगट ट्रेसारख्या टेबलांवर ही पांढरी वाळू आहे.. एकेका संज्ञाशब्दाची आरशातली प्रतिमा- जशी छपाईतंत्रात वापरली जाते तशी- टेबलाशेजारीच असलेल्या लाटण्यांसारख्या दंडगोलाकार सिरॅमिक-शिल्पांवर कोरलेली आहे. ते लाटणं आपण हाती घ्यायचं आणि वाळूवर फिरवायचं. वाळूवर शब्द उमटतो. आपण हा शब्द तसाच ठेवावा म्हटलं तरी दुसरं कुणी तरी येऊन, वाळू सपाट करण्यासाठी तो शब्द पुसून टाकणारच असतं. वाळूतल्या शब्दांचा हा खेळ सिरॅमिकच्या साधनांनिशी खेळता-खेळता शेजारच्याच भिंतीवर, घरं आणि झाडं यांची एकत्रित शिल्पं आपण पाहू लागलेले असतो. वाळूतले शब्द क्षणार्धात पुसले जातात आणि झाडं/ घरं कैक वर्षांनी का होईना, होत्याची नव्हती होतच राहतात असं काही तरी वाटू लागलेलं असतं एव्हाना!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा