‘दुनियादारी’ आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या प्रदर्शनावरून सुरू झालेल्या वादाला अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी केलेल्या मध्यस्थीनंतर पूर्णविराम देण्यात आला. शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’साठी एकपडदा चित्रपटगृहातून दुनियादारी उतरवण्यात येणार होता. आता ज्या ४० चित्रपटगृहांमध्ये ही समस्या उद्भवली होती तिथे दोन्ही चित्रपटांचे समसमान शो दाखवले जावेत, या अटीवर हा वाद सोडवण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली.
‘चेन्नई एक्सप्रेस’ ला दिवसाचे चारही शो दिले तरच तुम्हाला चित्रपट मिळेल, असा प्रस्ताव यूटीव्हीने एकपदडा चित्रपटगृह मालकांसमोर ठेवला होता. त्यामुळे, ‘दुनियादारी’ला ९ ऑगस्टपासून एकपडदा चित्रपटगृहांमधून बुकिंग देण्यात आले नव्हते. यूटीव्हीच्या या निर्णयाचा निषेध करत ‘दुनियादारी’ उतरवला तर ‘चेन्नई एक्सप्रेस’ प्रदर्शित करू देणार नाही, असा मनसे स्टाईल इशारा बुधवारी देण्यात आला होता. यासंदर्भात ‘चेन्नई एक्सप्रेस’चा दिग्दर्शक रोहित शेट्टी, यूटीव्ही आणि रेड चिलीजचे काही अधिकारी आणि ‘दुनियादारी’चे निर्माते नानूभाई, दिग्दर्शक संजय जाधव आणि कलाकारांची राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत कोणताही मराठी चित्रपट न उतरवता ‘चेन्नई एक्स्प्रेस’ दाखवला जावा, यावर एकमत झाल्याची माहिती खोपकर यांनी दिली.
‘दुनियादारी’ आता ज्या चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे तिथे तो पुढच्या आठवडय़ातही दाखवण्यात येणार आहे. या सर्व चित्रपटगृहांमध्ये ‘दुनियादारी’चे दोन शो आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’चे दोन शो दाखवले जाणार आहेत. याशिवाय, इतर जे मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत त्यांनाही योग्य बुकिंग दिले जाणार आहे.