कुलदीप घायवट
मुंबई : जयपूर – मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये मुस्लीम प्रवाशांवर गोळीबार करून त्यांची हत्या करणारा आरोपी चेतन सिंह हा बोरिवली रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे. तो परधर्माबाबत अधिक द्वेष करीत असून कोठडीतही त्याचा प्रत्यय येत आहे. तो पोलिसांच्या गणवेशावरील ‘नेमप्लेट’ वाचून संबंधित पोलीस कोणत्या धर्माचा आहे याची पाहणी करतो. जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये ३१ जुलै रोजी पहाटे ५ वाजता आरोपी चेतन सिंह याने त्याचे वरिष्ठ आणि तीन प्रवाशांना ठार मारले. तीन प्रवाशांची हत्या धार्मिक कारणांमुळे झाल्याचे सिद्ध झाले आहे. आरोपीला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कुटुंबियांची लवकरच चौकशी..
आरोपी मूळचा उत्तर प्रदेशमधील हाथरस गावातील रहिवासी आहे. त्यामुळे आरोपी, त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातून त्याचे नातेवाईक येणार असल्याची माहिती वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने दिली.
ध्वनिचित्रफीत कोणी प्रसारित केली ?
एक्स्प्रेसमधील ‘एस ५’ डब्यातील ७२ आसनावरील प्रवाशाचा शोध सुरू आहे. आरोपी चेतन सिंहची पाठीमागून ध्वनिचित्रफीत काढणारा आणि त्वरित समाजमाध्यमावर प्रसारित करणारा याच आसनावरील प्रवासी असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या आसनावरील प्रवाशाचा शोध सुरू आहे.
४० प्रवाशांची चौकशी..
गोळीबाराच्या घटनेचा छडा लावण्यासाठी रेल्वे पोलीस एक्स्प्रेसमधील प्रवाशांचा शोध घेत असून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात येत आहे. तसेच मुंबईबाहेरच्या प्रवाशांसोबत मोबाइलवर संवाद साधून चौकशी करण्यात येत आहे. दोन दिवसांत सुमारे ४० प्रवाशांची चौकशी केली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण, प्रवाशांच्या चौकशीतून मिळालेली माहिती, समाजमाध्यमावर असलेल्या ध्वनिचित्रफीत हाती आली आहे. त्यानुसार तपास सुरू आहे. तपासात कोणतीही कुचराई होत नाही. – डॉ. प्रज्ञा सरवदे, लोहमार्ग पोलीस महासंचालक