नागरी पुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या मनातील शल्य बोलून दाखवलं आहे. तसेच माझी काहीच चूक नसताना माझा राजीनामा घेण्यात आला, असा आरोप केला. ते लोकसत्ताच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात सहभागी झाले असताना ही भूमिका मांडली.
छगन भुजबळ म्हणाले, “तेलगी घोटाळ्यात माझी बदनामी झाली. वास्तविक मी गृहमंत्री असताना तेलगीला मोक्का लावला होता. त्याची सीबीआय चौकशी झाली. तेव्हा केंद्रात भाजपाचे सरकार होते. सीबीआयने दोन आरोपपत्रे दाखल केली, त्यात छगन भुजबळ हे नाव नव्हते. नंतर यूपीए सरकार आले, त्या वेळी एक आरोपपत्र दाखल झाले, त्यातही माझे नाव नव्हते. तरीही माझा मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला.
“…हे शल्य माझ्या मनात कायम आहे”
“माझी काही चूक नसताना राजीनामा घेण्यात आला आणि माझ्या नावाची बदनामी झाली हे शल्य माझ्या मनात कायम आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून पाचव्या, पाचव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर आलो. हे कशासाठी केले हा फक्त प्रश्न विचारला, त्यावर एवढे काहूर माजले. सगळे खूप रागावले, त्यामुळे यापुढे या विषयावर बोलायचे नाही, असे मी ठरवले आहे,” असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.
“बाळासाहेब ठाकरे सारखे मला लखोबा, लखोबा म्हणायचे आणि…”
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “मी शिवसेना सोडली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची गोष्टच वेगळी होती. त्या वेळी मी कुठे कटू भूमिका घेतली होती? मी शांतच होतो. पण ते सारखे मला लखोबा, लखोबा म्हणायचे आणि ते व्यंगचित्र काढणे वगैरेतून वाद वाढत गेला. मग मी म्हटले की आपणही बोलायला पाहिजे. परंतु कुठे थांबायचे हे आम्हाला कळले.”
“आता मी शरद पवारांच्या विरोधात काही बोलत नाही”
“नंतर मी पुढे बाळासाहेबांवरील खटला मागे घेतला, बाळासाहेबांनीही मला सहकुटुंब जेवायला बोलावले, मिटले सगळे. आता मी शरद पवारांच्या विरोधात काही बोलत नाही. मी फक्त चार गोष्टी सांगितल्या, तुम्ही येवल्यात आलात, भुजबळांना विरोध, बीडमध्ये गेलात मुंडेंना विरोध, कोल्हापुरात गेलात मुश्रिफांना विरोध, बारामतीत गेलात, तिथे म्हणालात की अजित पवार आमचे नेते आहेत, हे बरोबर आहे का?” असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला.
हेही वाचा : आरक्षण हा सरकारचा ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही!
“अजित पवार शरद पवारांचे नेते मग आम्ही कोण?”
“अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेलो, ते तुमचे नेते मग आम्ही कोण, हा आमचा प्रश्न आहे, यात टीका कुठे आली? शरद पवार यांचे काम मी जवळून पाहिले आहे. ३० वर्षे मी त्यांच्याबरोबर होतो. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जे काम केले आहे, त्याचा ठसा आमच्या मनावर आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधान म्हणून आम्ही बघतो. त्यांचे काम चांगले चालले आहे, त्यांच्या कारकीर्दीत चांगले निर्णय झाले आहेत,” असंही छगन भुजबळ यांनी नमूद केलं.