मुंबई : विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून पक्ष संघटनेत पद मिळावे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली असतानाच, प्रदेशाध्यक्ष किंवा विरोधी पक्षनेते यापैकी एका पदावर इतर मागासवर्ग समाजातील (ओबीसी) नेत्याला संधी देऊन भाजप व काँग्रेसप्रमाणेच पक्षाने जातीचे समीकरण साधावे, अशी भूमिका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी मांडली. अजित पवारांपाठोपाठ भुजबळ यांच्या मागणीने राष्ट्रवादीतील गुंता अधिकच वाढला आहे.
अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून पक्ष संघटनेत संधी द्यावी, अशी मागणी करून प्रदेशाध्यक्षपदावर इच्छूक असल्याचे सूचित केले. अजित पवार यांना पक्षाने संधी दिलीच तर आपल्याला विरोधी पक्षनेतेपद मिळावे, अशी जयंत पाटील यांनी इच्छा लपून राहिलेली नाही. भुजबळ यांनी ओबीसी नेत्याला संधी द्यावी, अशी मागणी करून राष्ट्रवादीतील पदांच्या रचनेला वेगळेच वळण दिले. काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात व नाना पटोले असा मराठा व ओबीसी समतोल साधण्यात आला आहे. भाजपमध्ये ओबीसी समाजातील चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविण्यात आले आहे.
राष्ट्रवादीतही प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्षनेतेपदापदवर असा समतोल साधता येऊ शकतो. प्रदेशाध्यक्षपदावर ओबीसी किंवा अन्य दुर्बल घटकातील कोणत्या नेत्याची निवड केल्यास वेगळा संदेश जाऊ शकतो. सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड किंवा धनंजय मुंडे हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. अगदी माझ्याकडे जबाबदारी सोपविली तरीही मी स्वीकारण्यास तयार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष मराठा समाजातील होणार असल्यास ओबीसी समाजाकडे विरोधी पक्षनेतेपद किंवा विरोधी पक्षनेता मराठा असल्यास प्रदेशाध्यक्ष ओबीसी समाजातील नेत्याकडे सोपवावे, अशी मागणी भुजबळ यांनी केली.
बदल होणार का ?
- अजित पवार यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी पक्षाध्यक्ष शरद पवार कोणती भूमिका घेतात यावर सारे अवलंबून आहे. सुप्रिया सुळे यांची अलीकडेच कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आले. अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवले तर शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष, सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष आणि अजित पवार प्रदेशाध्यक्ष अशी एकाच घरात तीन पदे राहतील आणि राष्ट्रवादी म्हणजे पवार प्रायव्हेट कंपनी, असा प्रचार करण्यास विरोधकांना संधी मिळेल, अशी भीती राष्ट्रवादीला आहे.
- अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आल्यास विरोधी पक्षनेतेपदी कोणला संधी दिली जाईल याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याकरिताच ठाण्यातीलच जितेंद्र आव्हाड यांचा विचार होऊ शकतो. भुजबळ यांनी ओबीसी कार्ड बाहेर काढल्याने एका पदावर राष्ट्रवादीला या समाजाला संधी द्यावी लागेल अशी चिन्हे आहेत.
‘माझ्या भावाच्या इच्छा पूर्ण होवोत!’
पुणे : माझ्या दादाला संघटनेत काम करण्याची संधी द्यायची की नाही, याचा निर्णय संघटनात्मक पातळीवरचे नेते घेतील. पण माझ्या भावाच्या इच्छा पूर्ण होवोत, अशीच माझीही इच्छा असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी दिली. विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून मला संघटनेमध्ये काम करू द्यावे, अशी इच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली. त्याचे राजकीय स्तरावर वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. या संदर्भात यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ‘माझ्या भावाच्या इच्छा पूर्ण होवोत, अशीच माझीही इच्छा आहे’, असे मत व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, ‘‘दादांना संघटनेत पदावर संधी द्यायची की नाही, हा संघटनात्मक पातळीवरील निर्णय आहे. मला मनापासून आनंद आहे, की दादालाही संघटनेत काम करायची इच्छा आहे. त्यामुळे कार्यकर्ता केडरमध्ये उत्साह संचारला आहे. दादांना प्रदेशाध्यक्षपद द्यायचे की नाही हा संघटनात्मक पातळीवरचा निर्णय आहे. पण माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच बहीण म्हणून माझी इच्छा आहे.