राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या अब्रू नुकसान खटल्याचा एक किस्सा सांगितला. हा खटला का केला हे सांगताना सुभाष देसाई आणि संजय राऊतांच्या चिट्ठीनंतर जिंकत असलेला खटला न्यायाधीशांना हात जोडून विनंती करत मागे घेतल्याचंही सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१३ ऑक्टोबर) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात छगन भुजबळ यांचा ‘अमृत महोत्सव’ सोहळा पार पडला. यावेळी भुजबळ बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छगन भुजबळ म्हणाले, “रमाबाई नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. आंदोलन झालं, त्यावर गोळीबार झाला आणि ११ लहान-मोठी माणसं मारली गेली. मी विधानसभेत येऊन सांगितलं की, हे सरकार खुनी आहे. यांनी लोकांचे खून केले. दुसऱ्या दिवशी माझ्या घरावर हल्ला झाला. राजू जैन म्हणून एका व्यक्तीने तर मला छगन भुजबळ यांनी विटंबना कर म्हणून सांगितलं आणि मी नाही सांगितलं म्हणून त्यांनी दुसऱ्याकडून विटंबना करून घेतली, असं प्रतिज्ञापत्र दिलं.”

“सामनात छापून आलं, हाच तो नराधम, यानेच विटंबना केली”

“सामनात छापून आलं, हाच तो नराधम, यानेच विटंबना केली. मी म्हटलं, मी काहीच केलं नाही. या प्रकरणात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गुंडेवार यांच्या आयोगाची नेमणूक झाली. त्यांनी मलाही बोलावलं. चौकशीत लक्षात आलं की प्रतिज्ञापत्र देणारा व्यक्ती जेव्हा माझ्याकडे आला असं सांगत होता, तेव्हा मी कांदिवलीत झोपड्या तोडू नये म्हणून मोर्चात होतो. त्याने ज्या हॉटेलमध्ये राहिल्याचं सांगितलं त्या हॉटेलमध्ये तो व्यक्ती राहिलाच नाही. ज्या बसने गेला सांगितलं ती बसच तिकडे नाही. यानंतर गुंडेवार आयोगाने मला क्लीन चिट दिली,” अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

“मी बाळासाहेब ठाकरेंविरोधात अब्रु नुकसानीचा खटला केला, कारण…”

छगन भुजबळ पुढे म्हणाले, “मी बाळासाहेब ठाकरेंवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला. कारण एकीकडे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची क्लीन चिट, तर दुसरीकडे सामनाचं ‘हाच तो नराधम’ या मथळ्याखाली वृत्त. त्यात प्रश्नचिन्ह नव्हतं. खटला सुरू झाला. सांगण्यासारखं काहीच नव्हतं, आरोप आणि क्लीन चिट अशा सर्व गोष्टी सर्वांसमोर होत्या. काही महिन्यांनी सुभाष देसाई, संजय राऊत आले आणि एक चिट्ठी दिली.”

“… आणि मी न्यायाधीशांना विनंती केली की मला केस मागे घ्यायची आहे”

“मी त्यांना विचारलं काय काम आहे? ते म्हटले बाळासाहेबांचं वय झालं, आजारीही असतात. माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं थांबा, आता काहीच बोलू नका. काय करायचं हे मला कळलं. केस कधी आहे ते सांगा. त्यांनी तारीख सांगितली. मी त्या दिवशी न्यायालयात गेलो. मी न्यायाधीशांना विनंती केली की मला केस मागे घ्यायची आहे. पाच मिनिटे ते ऐकायलाच तयार नव्हते. ते म्हणाले केस पूर्ण झाली. केसचा काय निकाल आहे हे तुम्हाला कळतं का? तुम्ही काय करता असं मला म्हटले,” असं छगन भुजबळांनी सांगितलं.

“आठ दिवसांनी बाळासाहेबांनी मला फोन केला आणि…”

“मी म्हटलं मी तुमचे अगदी पाय धरतो, मला केस मागे घ्यायची आहे. केस मागे घेतली. मग इतरांचं काय? सुभाष देसाई विश्वस्त आहेत. त्यांच्याविरोधातील केसही मागे घेतली. तेव्हा उद्धव ठाकरे तेथेच पाठीमागे होते. त्यांनी सांगितलं बाळासाहेबांनी तुम्हाला चहाला बोलावलं आहे. मी सांगितलं नंतर येतो. आठ दिवसांनी बाळासाहेबांनी मला फोन केला आणि पूर्ण कुटुंबाला घेऊन मातोश्रीवर यायला सांगितलं,” असं भुजबळांनी नमूद केलं.

हेही वाचा : लोक विचारतात तुमच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली? शरद पवारांसमोर छगन भुजबळांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“यानंतर मी, समीर, पंकज, त्यांच्या मुली असे सगळे मातोश्रीवर गेलो. तीन-चार तास चर्चा, चहा, नाश्ता, जेवण झालं. जणुकाय आमच्या आयुष्यात काही घडलंच नाही. ते भांडण झालंच नाही,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal recall incident when he filed defamation case against balasaheb thackeray pbs