मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांच्या तुळापूरच्या (ता. शिरुर) वढू येथील स्मारकासाठी राज्य सरकारने एक हजार रुपयांची लाक्षणिक तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये केली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीराजेंचा उल्लेख ‘ स्वराज्य रक्षक ’ असा करण्यात आला आहे. राज्य सरकारने सहा हजार ३८३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर केल्या आहेत.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा उल्लेख ’ स्वराज्य रक्षक ’ असा केल्यावर ते ‘ धर्मवीर ’ होते, असा जोरदार आक्षेप घेण्यात आला होता आणि भाजपसह इतरांनी आंदोलनही केले होते. पुढे हे आंदोलन गुंडाळले गेले. मात्र राज्य सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये छत्रपती संभाजीराजे यांचा उल्लेख ‘ स्वराज्य रक्षक ’ असाच करण्यात आल्याने विरोधकांकडून हा मुद्दा मंगळवारी विधिमंडळात उपस्थित करण्यात येणार आहे.
दरम्यान, या पुरवणी मागण्यांमध्ये उद्योगांना प्रोत्साहनपर अनुदानासाठी ७६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह मोठय़ा व विशाल उद्योगांसाठीही प्रोत्साहन देण्याची योजनेमध्ये तरतूद आहे. रस्ते आणि पुलांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ४५२ कोटी रुपये आणि शासकीय इमारतींच्या दुरुस्तीसाठी ९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील ३८ शासकीय रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी तीन ते दहा कोटी रुपयांपर्यंत तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्याचे विधान परिषदेत पडसाद
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावलेल्या चहापान प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांबद्दल केलेल्या वक्तव्याचे विधान परिषदेत पडसाद पडले. मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी आक्रमक झालेल्या विरोधकांनी केली आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार घातला होता. याविषयी भाष्य करताना ‘बरे झाले, देशद्रोह्यांबरोबरचे चहापान टळले’, अशा आशयाचे विधान केले होते.