छत्रपती संभाजी राजेंचा राज्य सरकारला इशारा
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा, केंद्राच्या आरक्षण सूचित समाजाचा समावेश करण्यासाठी राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना प्रस्ताव पाठवावा तसेच समाजाच्या विविध मागण्यांबाबत ६ जूनपूर्वी तोडगा काढावा. अन्यथा शिवराज्याभिषेकदिनी करोनाची पर्वा न करता राज्यभरात आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली जाईल आणि त्याची सुरुवात रायगडावरून के ली जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शुक्रवारी राज्य सरकारला दिला. या समाजासाठी आपापसातील राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
चिथावणीखोर वक्तव्ये करू नका
मराठा आरक्षणावरून रस्त्यावर उतरून जाब विचारू, अशी चिथावणीखोर वक्तव्ये करण्यात येत आहेत. राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असताना अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पुणे येथे नमूद केले.