मुंबई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना म्हाडाच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात हक्काची घरे देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. छत्रपती संभाजी नगरातील नक्षत्रवाडी येथे परवडणारी १,०५६ घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली. छत्रपती संभाजी नगर येथील १,१३३ घरांसह ३६१ भूखंडासाठी सावे यांच्या हस्ते मंगळवारी सोडत काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
छत्रपती संभाजी नगर मंडळाकडून छत्रपती संभाजी नगर शहर व जिल्हा, लातूर, जालना , नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेतील १,१३३ घरांसह ३६१ भूखंडासाठी फेब्रुवारीत अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या सोडतपूर्व प्रक्रियेला काही कारणाने २६ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतर सोडतीचा निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र ही सोडत आचारसंहिता आणि इतर कारणाने रखडली होती. पण अखेर मंगळवारी सावे यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
हेही वाचा : मुंबईतील विमान प्रवासी संख्येत ७ टक्क्यांची वाढ
आर्थिक दुर्बल घटकासाठी मोठ्या संख्येने घरे उपलब्ध करून देणे आमचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी म्हाडाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून लवकरच नक्षत्रवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १,०५६ घरांचा गृहप्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा सावे यांनी केली. हा गृहप्रकल्प अत्याधुनिक सोयी – सुविधांयुक्त असून खाजगी विकासकांच्या तुलनेत स्पर्धा करणारा असेल, असा दावाही त्यांनी केला. नक्षत्रवाडी येथील गृहप्रकल्प प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्याचे प्रस्तावित असून लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या सोडतीचा निकाल म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.