मुंबई: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर आहे. छत्रपती संभाजीनगर येथील निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सोयी- सुविधा उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, त्यांच्या सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. ‘चिठ्ठीमुक्त घाटी’ या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाचे कौतुक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी भेट देऊन अतिविशेषोपचार रुग्णालयाची पाहणी केली आणि डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ.अजय चंदनवाले, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे उपस्थित उपस्थित होते.

हेही वाचा – Ganesh Immersion 2024 Arrangements : पूर्व उपनगरांतील वाहतूक व्यवस्थेत बदल

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, तुम्ही सगळे डॉक्टर सामान्यांसाठी विघ्नहर्त्याची भूमिका पार पाडतात. अडीच वर्षांपूर्वी आमचं सरकार आलं तेव्हापासून सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून निर्णय घेत आलो आहोत. आरोग्याच्या क्षेत्रातही सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आम्ही निर्णय घेतले आहेत. राज्यातील सामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पुढाकार घेतला आहे. आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर आमचा भर आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांना ५ हजार रुपये दरमहा सुधारित मानधन देण्याचा निर्णय घेतला असून वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे.

सद्यस्थितीमध्ये अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या इमारतीमध्ये बाहयरुग्ण विभाग, कक्ष, आय.सी.यु. शस्त्रक्रियागृहे इत्यादी सेवा युरॉलॉजी, न्युरोसर्जरी, कार्डियॉलॉजी, प्लॅस्टिक सर्जरी, अशा प्रकराच्या अतिविशेषोपचार सेवा सुरु केलेल्या आहेत. यासेवेचा लाभ मराठवाड्यासह बुलढाणा, वाशिम, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर अशा एकूण १४ जिल्ह्यांमधून येणाऱ्या गोर-गरीब रुग्णांना फायदा होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

घाटी रुग्णालयाचा मराठवाड्यातील लाखो रुग्णांना फायदा होतोय. ज्यावेळी हे महाविद्यालय सुरु झाले त्यावेळी फक्त ५० विद्यार्थी क्षमता होती व रुग्णखाटांची संख्या ३०० होती. आता विद्यार्थी क्षमता २०० इतकी झालेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत राज्य कर्करोग संस्थाही कार्यान्वित आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून डॉक्टर रुग्णांना जीवदान देण्याचे काम करतात. रुग्णांच्या तसेच त्यांच्या कुंटुंबियांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम डॉक्टर करतात. त्यामुळे शासन डॉक्टरांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य देत आहे. सुपरस्पेशॅलीटी सर्जिकल हॉस्पीटलसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Mumbai Metro 3 : ठरलं! ‘या’ दिवशी सुरू होणार मुंबई मेट्रो ३, भुयार मेट्रोबाबत मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

मुख्यमंत्री सहायता निधीचे पत्र प्राप्त होताच गरजूंना तात्काळ निधी देण्यात येत असून राज्यात दोन वर्षांत ३५० कोटी रुपये गरजू रुग्णांना उपचारासाठी देण्यात आले आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दिड लाखावरून पाच लाखांपर्यंत करण्यात आली आहे. या योजनेत राज्यातील सर्वांना सामावून घेण्यात आले आहे. आपले राज्य आरोग्य सेवेत अधिक प्रगत कसे करता येईल यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असून डॉक्टरांच्या मागण्या तत्परतेने पूर्ण करू असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी केले. डॉ सुक्रे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना ते आतापर्यंतचा प्रवास याबाबत माहिती दिली. मार्ड संघटनेचे अध्यक्ष रोहन गायकवाड यांनी मनोगतात राज्यातील निवासी डॉक्टरांच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहिले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य केल्याबद्दल नवजात शिशू विभागाचे डॉ.एल.एस. देशमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या डॉ. ज्योती बजाज, स्त्री रोग विभागाचे डॉ. श्रीनिवास गडप्पा, यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati sambhajinagar network of health system will be strengthened says cm eknath shinde ssb