राज्यभरात शिवजयंती उत्हासात साजरी
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. राज्य चालवताना शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
वर्षां शासकीय निवासस्थानी ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते. स्वराज्यावर अनेक संकटे आली, काही स्वकियांकडून तर काही परकियांकडून, पण महाराज कधीही झुकले नाहीत. त्यांचे शौर्य, व्यक्तिमत्त्व, रयतेच्या हितासाठी केलेले कार्य, दूरदृष्टी याचे दाखले आजही दिले जातात. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करून हा पराक्रमी इतिहास पुढील अनेक पिढय़ांच्या मार्गदर्शनासाठी जतन करण्याचे कामही सरकारने हाती घेतल्याचे सांगत शिवछत्रपतींची शिकवण डोळय़ासमोर ठेवून राज्य सरकार काम करीत आहे आणि पुढेदेखील करणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विधान भवनात परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळय़ास विधान मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती दिल्लीच्या वतीने शिवजयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले. कोल्हापूर येथील छत्रपती परिवारातील युवराज्ञी राजे संयोगिता राजे छत्रपती, युवराज राजे शहाजी राजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळयाला छत्रपती परिवारातील सदस्य, खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हसंराज अहिर, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तांसह वरिष्ठ अधिका-यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.