दृश्यकलेची प्रदर्शनं ही काय ‘सहली’साठी नसतात. ट्रिपला गेलेली मंडळी जशी भिरीभिरी फिरतात, तसं प्रदर्शनात फिरायचं नसतं. हे सगळं माहीत असूनही अस्संच शीर्षक या मजकुराला दिलंय, ते फक्त तुम्हां प्रेक्षकांवर विश्वास आहे म्हणून! तुम्ही या प्रदर्शनांना २३, २४ किंवा २५ तारखांना सहकुटुंब किंवा आप्तेष्टांसह जाऊन कलेचा आस्वाद स्वत: घ्याल आणि आप्तमंडळींनाही घेऊ द्याल, म्हणून.

तिकीट दर जरा महागच वाटले तरीही जाऊन पाहावं असं प्रदर्शन रीगल सिनेमासमोरच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’त (पूर्वीचं ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’) सध्या भरलं आहे. ब्रिटिश म्युझियम (लंडन) आणि नॅशनल म्युझियम (नवी दिल्ली) यांच्या सहकार्यामुळे देश-विदेशातील कलावस्तू मुंबईत पहिल्यांदाच आल्या आहेत! तामिळनाडूतल्या अत्तिरम्पक्कम् इथं आढळलेली अश्मयुगीन कुऱ्हाड (किमान दहा लाख वर्षे जुनी) किंवा इसवी सनापूर्वीच्या किमान २८०० वर्षांपूर्वीचा अगदी छान चित्रंबित्रं काढून सजवलेल्या बाऊलसारखा बलुचिस्तानात आढळलेला वाडगा, इराकमध्ये आढळलेला इसवी सनपूर्व २४०० वर्षांपूर्वीचा स्त्री-पुतळा.. अशा किती तरी अस्सल इतिहास दाखवणाऱ्या वस्तू आत्ता मुंबईत आहेत. हे प्रदर्शन १८ फेब्रुवारीपर्यंत असल्यानं ‘काळा घोडा उत्सवाच्या आगेमागे जाऊ कधी तरी’ म्हणून भेट लांबणीवर टाकता येईल. या संग्रहालयाला राष्ट्रीय सण वगळता कध्धीच सुट्टी नसते; त्यामुळे सबबी काढू नका!

राजा रविवर्मा यांच्या आणि त्यांच्या स्टुडिओनं किंवा छापखान्यानं केलेल्या चित्र व प्रिंटचं प्रदर्शन वरळीच्या ‘नेहरू सेंटर आर्ट गॅलरी’त भरलं आहे. यापैकी अनेक चित्रं मराठीभाषक रसिकांना बहुधा माहीत असतात; पण तरीही जावंच, असं हे प्रदर्शन ६ जानेवारीच्या शनिवारी संपणार आहे. म्हणजे ३०-३१ ला बाहेर असल्यास याच आठवडय़ात रविवर्माची चित्रं पाहावी लागतील.

ही दोन प्रदर्शनं ‘अत्यावश्यक’ या सदरातली आहेत. बाकीची अवश्य पाहावी वगैरे अशी.. त्यापैकी एक अगदी रीगलच्याच चौकात, म्युझियमसमोरच्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’मध्ये आहे. ‘लाफिंग इन द व्हर्नाक्युलर’ हे या प्रदर्शनाचं नाव! त्यात २८ गाजलेल्या कलावंतांचा सहभाग आहे. भारतीय दृश्यकलावंतांनी गेल्या तीसेक वर्षांत, प्राचीन/जुन्या आणि नव्याही भारतीय संदर्भाचा आधार घेऊन काही नर्मविनोदी किंवा एकूणच कलाव्यवहार आणि आयुष्याकडे ‘लाइटली’ पाहणाऱ्या कलाकृती साकारल्या. त्यापैकी काही कलावंतांना मुद्दाम निमंत्रण देऊन त्यांच्या खास नव्या कलाकृती इथं मांडल्या आहेत, तर के. जी. सुब्रमणियन, भूपेन खक्कर, अतुल दोडिया, अमित अम्बालाल यांनी आधीच केलेली काही चित्रं इथं आणवली गेली आहेत. ‘पाहताना मजा वाटते’ इथपासून ते ‘हसूच येतं पाहिल्यावर’ इथपर्यंतच्या प्रतिक्रिया याव्यात, अशा कलाकृतींचा हा मेळा १४ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. नेहरू सेंटर आणि ‘नॅशनल गॅलरी’ हे दोन्ही सोमवार वगळता सकाळी दहा ते सायं. पाचपर्यंत सुरू असतात.

आणखी एक प्रदर्शन म्हणजे ‘आर्ट फॉर ऑल’ म्हणवणारं, कुलाब्याच्या ससून गोदीतलं ‘स्टार्ट-मुंबई अर्बन आर्ट फेस्टिव्हल’चा भाग असलेलं दृश्यकला प्रदर्शन. ते ३० डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे.

जहांगीरमधलं तरुण चिंतन..

अमोल तोटे आणि देवदत्त पाडेकर यांची चित्रं या मजकुरासोबत आहेत. या दोघांची चित्रं किंवा त्यामागला विचार एकमेकांपेक्षा अगदी निरनिराळा; पण चित्रामागे काही चिंतन असतं, हे अनेक तरुण चित्रकारांच्या चित्रांमुळे जाणवू शकतं.

रंगनिवड आणि रंगलेपन वा रंग-फटकाऱ्यांतून संवेदनांना जिवंत करणारे देवदत्त पाडेकर यांचं चित्रप्रदर्शन ‘जहांगीर आर्ट गॅलरी’च्या वातानुकूल दालन क्रमांक दोनमध्ये भरलं असून त्यांच्या यंदाच्या प्रदर्शनाचा विषय ‘पंचेंद्रियांच्या संवेदना’ हाच आहे. फटकारेदार, तरीही कॅनव्हासच्या प्रतलावरून (इम्पास्टोसारखं) बाहेर न येता कॅनव्हासशी घट्ट नातं सांगणारं रंगलेपन, त्यातूनच जणू आपसूक उद्भवल्यासारखे भासणारे आकार आणि हे असे सहज भासणारे आकार प्रमाणबद्धतेच्या तांत्रिक कसोटय़ा पाळून वर लालित्यपूर्ण अनुभव देणारे असणं, ही देवदत्त यांच्या चित्रांची अनेकदा दिसलेली वैशिष्टय़ं आहेत. ती ताज्या प्रदर्शनात आहेतच, पण विशेषत: गंधाचा (वासाचा) अनुभव आणि श्राव्य अनुभव यांची जोडही चित्रांना दिलेली असल्यामुळे या चित्रप्रदर्शनाला काही प्रमाणात मांडणशिल्पाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. चिमण्या, गुलाबपुष्पं, डाळिंबं यांचे आकार एकेका विषयावरल्या चित्रात अनेकदा येतात तेव्हा एखाद्याच भाषेच्या वर्णमालेत जशी सरूपता आणि वैविध्यही दिसतं, तशा मुळाक्षरांचं हे कॅनव्हासवर साकार झालेलं सुलेखन आहे, असा अनुभव प्रेक्षकाला येऊ शकतो. केवळ ‘प्रत्यक्षा’चा दरारा दाखवणं हे देवदत्तचं साध्य नाही. तो चित्रांमधल्या कल्पनेच्या (आणि कल्पनातीत) भराऱ्याही दाखवतो. फक्त या भराऱ्या विषयमांडणीच्या नसून थेट रंगांच्याच असतात. देवदत्तने रंगवलेला कॅनव्हास प्रत्येक नीट पाहिलात, तर शतकभरापूर्वीचे अमूर्त चित्रकार जसं ‘चित्र हीच वस्तू’ म्हणायचे, तशी तात्त्विक भूमिका देवदत्त घेतो आहे, हे लक्षात येईल. ही भूमिका हल्लीच्या काळात अभिजाततावादी ठरते. या चित्रांमध्ये वारंवार जणू विषयनिवेदनच करणारे स्त्रीदेह अधिक असायचे, त्यांची संख्या या प्रदर्शनात कमी आहे हेही स्वागतार्हच.

अमोल तोटे, राजू मोरे आणि विनोद चव्हाण यांच्या चित्रांचं प्रदर्शन ‘जहांगीर’च्या सभागृह दालनात भरलं आहे. यापैकी राजू मोरे यांनी थेट लेण्यांमधील शिल्पसौंदर्य असा विषय निवडून त्याची मांडणी आणि आकार-रंग यांकडे लक्ष दिलं आहे, विनोद चव्हाण हे लघुचित्रं, अमूर्तचित्रं यांची दृश्य-सांगड आपल्याला आजच्या काळातल्या निमशहरांमध्ये दररोज दिसणाऱ्या दृश्यांशी घालत आहेत, तर अमोल तोटे अर्थव्यवस्थेची दशा आणि दिशा यांबद्दलचे विचार चित्रांमधून मांडत आहेत. रुपयाचं नाणं, ट्रॅक्टर, शेतजमीन, ‘पेव्हर ब्लॉक’, गाय वा बैल.. अशी आजच्या काळातली प्रतीकं त्यांच्या चित्रांत सूचकपणे येतात; पण हा असा विचार मांडताना सांकेतिकतेत अडकण्याचा धोकाही असतो.

‘जहांगीर’च्या तिसऱ्या वातानुकूल दालनात सतीश दामले यांची आकार-रंगांचा खेळ मांडणारी केवलाकारी चित्रं दिसतात. या रंगीबेरंगी खेळातून सतीश दामले हळूहळू शांततेकडे वळताहेत, निसर्गाचा आधार या चित्रांना असल्याचं स्वत:शी कबूल करताहेत, असं त्यांची नवी आणि गडद-गहिऱ्या रंगांमधली काही (चार-पाच) चित्रं सांगतील. श्रद्धा राणे यांच्या आधुनिकतावादी चित्रांचंही प्रदर्शन नव्या ‘टीसीएस दालना’त  (समोवार रेस्तराँच्या जागी) भरलं आहे.

Story img Loader