मुंबई : ‘ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव’, ‘हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ असे संवाद असलेले प्रसंग पाहून आपसूकच अंगावर येणारा काटा आणि ‘हर हर महादेव’ व ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या घोषणांनी देशभरातील चित्रपटगृह दुमदुमली आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा धगधगता इतिहास मांडणाऱ्या बहुप्रतीक्षित ‘छावा’ या हिंदी चित्रपटाची तिकीट खिडकीवर यशस्वी घौडदौड सुरू आहे. ऐतिहासिक कथेला कलाकारांच्या दमदार अभिनयाची आणि वैशिष्ट्यपूर्ण सिनेमॅटोग्राफीची जोड मिळाली असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ट्रेड विश्लेषक तरण आदर्श आणि मॅडोक फिल्म्सने दिलेल्या माहितीनुसार, ‘छावा’ने प्रदर्शनानंतर ४ दिवसांत संपूर्ण भारतात एकूण १४५.५३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष बाब म्हणजे ‘छावा’ चित्रपटाचे देशातील विविध ठिकाणांसह मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतही चित्रीकरण झाले आहे.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीत वैविध्यपूर्ण विषयांवर आधारित अनेक चित्रपट, मालिका, वेबमालिका आणि जाहिरातींचे सातत्याने चित्रीकरण पार पडत असते. सध्या सर्वत्र चर्चेत असणाऱ्या ‘छावा’ चित्रपटातील थरारक दृश्यांचे चित्रीकरणही हिरवाईने नटलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत पार पडले होते. ‘छावा’ चित्रपटातील थरारक दृश्ये आणि संवाद प्रेक्षकांच्या थेट हृदयाला भिडत असून आपसूकच डोळ्यात पाणी येत आहे. तसेच चित्रपट पाहून झाल्यानंतर समाजमाध्यमांवर चित्रफिती व छायाचित्रे टाकून भरभरून चित्रपटाबाबत लेखन केले जात आहे. तसेच प्रेक्षकांकडूनही मोठ्या प्रमाणात मौखिक प्रसिद्धी केली जात आहे.
शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित ‘छावा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल याने साकारली असून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ‘महाराणी येसूबाई’ यांच्या भूमिकेत झळकत आहे. तर अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट शुक्रवार, १४ फेब्रुवारीपासून सर्वत्र प्रदर्शित झाला असून राज्यासह देशभर आणि जगभर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विकी कौशल याने सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील बाबुलनाथ मंदिराला भेट देत दर्शनही घेतले. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीचे आकर्षण असून चित्रपटगृहांबाहेर तिकीट खरेदी करण्यासाठी मोठ्या रांगा लागत आहेत. तसेच ऑनलाईन माध्यमातून तिकिटांचे मोठ्या प्रमाणात आगाऊ आरक्षण केले जात असून क्षणार्धात चित्रपटगृह हाऊसफुल्ल होत आहेत. सकाळी ७ पासून रात्री उशीरापर्यंतच्या शोजना चित्रपटगृह हाऊसफुल्ल होत आहेत. तब्बल १३० कोटी रुपये खर्च करून चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून बजेटची संपूर्ण रक्कमही वसूल झालेली आहे.
गोरेगाव चित्रनगरीची वैशिष्ट्ये
मुंबईच्या निसर्गरम्य परिसरात दादासाहेब फाळके चित्रनगरी वसली आहे. या चित्रनगरीत वैशिष्ट्यपूर्ण कलागारे (स्टुडिओ) आणि चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. तब्बल १६ कलागारे आणि ७० पेक्षा जास्त बाह्य व नाविन्यपूर्ण चित्रीकरण स्थळांसह डोंगर, तलाव यांसारखी नैसर्गिक स्थळेही चित्रनगरीच्या हद्दीत चित्रीकरणासाठी उपलब्ध आहेत. या चित्रनगरीत आजवर भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक ‘ब्लॉकबस्टर’ आणि ‘सुपर मेगा ब्लॉकबस्टर’ चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. तसेच मराठीसह संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीची भरभराट होण्यासाठी चित्रनगरीने अमूल्य योगदान दिले आहे.
‘छावा’ चित्रपटाची भारतात दिवसागणिक कमाई
दिवस पहिला (शुक्रवार, १४ फेब्रुवारी) : ३३.१ कोटी रूपये
दिवस दुसरा (शनिवार, १५ फेब्रुवारी) : ३९.३ कोटी रुपये
दिवस तिसरा (रविवार, १६ फेब्रुवारी) : ४९.०३ कोटी रुपये
दिवस चौथा (सोमवार, १७ फेब्रुवारी) : २४.१ कोटी रुपये