कुख्यात गुंड छोटा राजनकडे तब्बल ४००० ते ५००० कोटींची संपत्ती असल्याची माहिती उघड झाली आहे. मुंबई पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राजनची अर्धी संपत्ती ही भारतामध्येच असून मुंबई आणि अन्य शहारांमध्ये राजनने मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक केली आहे. राजनच्या देशाबाहेरील संपत्तीमध्ये चीन आणि जकार्तामधील हॉटेल्स, सिंगापूर आणि थायलंडमध्ये ज्वेलरीच्या दुकानांचा समावेश आहे. याशिवाय, आफ्रिकी देशांमध्ये विशेषत: झिम्बाम्बेमध्ये छोटा राजनचा हिऱ्यांचा व्यवसाय आहे. राजनने झिम्बाम्ब्वेमध्ये आश्रय मिळावा यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, भारताला हव्या असलेल्या गुन्हेगाराला आपल्या देशात आश्रय न देण्याच्या भूमिकेमुळे झिम्बाम्ब्वेकडून राजनला परवानगी नाकारण्यात आली होती. राजनने झिम्बाम्ब्वे सरकारकडे झेड-प्लस सुरक्षेचीही मागणी केली होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुत्रपिंडाच्या विकारामुळे आजारी असलेल्या छोटा राजनला झिम्बाम्ब्वेतील अधिकाऱ्यांनी सर्व वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, राजनने मागणी केलेली झेड-प्लस सुरक्षा पुरविण्यास या अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली होती. दाऊदचे हस्तक आपल्याला कधीतरी गाठणार हे राजनला ठाऊक होते. मात्र, त्यावेळी स्वत:ची शारीरिक अवस्था वाईट नसावी असा राजनचा विचार होता. त्यादृष्टीने राजन झिम्बाम्ब्वेत आश्रय घेण्याच्या तयारीत होता, त्यासाठीच राजन इंडोनेशियात आला होता. बाली पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हादेखील राजन झिम्बाम्ब्वेला जाण्याविषयीच बोलत असल्याची माहिती बाली पोलीस दलाचे आयुक्त रेईनहार्ड नेनग्गोलन यांनी दिली.

Story img Loader