पत्रकार जे. डे हत्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) कुख्यात छोटा राजनच्या आवाजाचे नमुने हवे आहेत. या संदर्भात ‘सीबीआय’ने शुक्रवारी न्यायालयात अर्ज दाखल केला. ‘मोक्का’ न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. एस. आडकर यांनी या संदर्भात छोटा राजनचे वकील अंशुमन सिन्हा यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी ११ फेब्रुवारीला होणार आहे.
‘सीबीआय’चे वकील भरत बदामी यांनी एका अर्जाद्वारे न्यायालयाकडे छोटा राजनच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठीची परवानगी मागितली. बदामी यांनी न्यायालयाला सांगितले, छोटा राजनने या अगोदर आपल्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र नंतर त्याने नकार दिला. छोटा राजन आणि एका व्यक्तीचा दूरध्वनीवरील संवाद असलेली ध्वनिफीत मुंबई पोलिसांनी न्यायालयाकडे सादर केली असून, त्या ध्वनिफितीमधील आवाजाची तुलना छोटा राजनच्या आवाजाशी करायची असल्याने आम्हाला आवाजाचा नमुना घेण्याची परवानगी मिळावी.
जे. डे यांच्या भ्रमणध्वनीची अद्यापही न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेली नसल्याची बाबही ‘सीबीआय’ने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच जे. डे यांचे दोन लॅपटॉप व एका संगणकाच्या हार्ड डिस्कची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी ‘सीबीआय’कडे सुपूर्द करण्याची विनंतीही न्यायालयाला करण्यात आली.
जे. डे हत्या प्रकरणासह छोटा राजनवर महाराष्ट्रात ७० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा