जे. डे यांच्या हत्येबाबत राजन याने न्यायालयाबाहेर अन्य व्यक्तींकडे दिलेली कबुलीच (एक्स्ट्रा ज्युडिशिअल कन्फेशन) विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने त्याच्यासह अन्य आठजणांना दोषी ठरवताना मुख्य पुरावा म्हणून ग्राह्य़ धरली. त्याच आधारे न्यायालयाने त्याच्यासह अन्य दोषी आरोपींना जन्मठेपेची शिक्षाही सुनावली.

विशेष ‘मोक्का’ न्यायालयाचे न्यायाधीश समीर अडकर यांनी ५९९ पानी निकालपत्रात राजन आणि अन्य आठ जणांना दोषी धरण्यामागील कारणमीमांसा केली आहे. जे. डे यांची हत्या ही संघटित गुन्हाच असून तो राजनच्या संघटित गुन्हेगारी टोळीने केला आहे हे सिद्ध करण्यात पोलिसांना यश आले आहे. डे यांची हत्या ही पूर्वनियोजित कट होता हेही पोलिसांनी सिद्ध केलेले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.  राजन याने डे यांच्या हत्येनंतर आपल्या काही साथीदारांशी, काही पत्रकारांशी संपर्क साधला होता. तसेच त्यानेच डे यांची हत्या घडवून आणल्याची कबुली दिली होती. त्याबाबत सादर केलेला पुरावा न्यायालयाने ग्रा धरला आहे. राजनच्या आवाजाचे नमुने सीबीआयने न्यायालयात सादर केले होते. न्यायालयाने तोही विश्वासार्ह पुरावा म्हणून ग्राह्य़ धरला आहे. ज्या काही पत्रकारांना राजनने दूरध्वनीवरून संपर्क साधून गुन्ह्य़ाची कबुली दिली होती, त्यांची साक्षही नोंदवण्यात आली. तसेच त्यांच्या साक्षीतून राजनला या प्रकरणी अडकवण्याचा त्यांचा कुठलाही हेतू नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या पत्रकारांनी दिलेली साक्ष ही विश्वासार्ह असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. साक्ष देणारे पत्रकार हे वरिष्ठ आणि अनुभवी असल्याने त्यांच्या साक्षीबाबत संशय व्यक्त करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यातून राजन हाच डे यांच्या हत्येसाठी कारणीभूत असल्याचे स्पष्ट होते, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. आरोपींकडून हस्तगत केलेली काही सिमकार्ड, मोबाइल आणि डे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आलेले पिस्तूल हे पुरावेही न्यायालयाने ग्राह्य़ धरले आहेत.आजारपण, कुटुंबाची हलाखीची परिस्थिती, लहान मुले, वृद्ध आई इत्यादी कारणे पुढे करत शिक्षेत माफी देण्याची आरोपींची विनंतीही न्यायालयाने फेटाळून लावली.

..म्हणून जिग्ना निर्दोष

डे यांची हत्या करण्यासाठी जिग्नाने राजनला भडकावल्याचा आरोप सीबीआयने केला असला तरी समोर आलेल्या पुराव्यांतून तिने असे केल्याचे सिद्ध झालेले नाही. तिचा या हत्येत काही सहभाग असल्याचेही पुढे आलेले नाही.  राजन याने अन्य व्यक्तींकडे दिलेल्या कबुलीबाबातही जिग्ना वा अन्य कुणी त्याला भडकावल्याचा उल्लेख नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जिग्नाची निर्दोष सुटका करत असल्याचे न्यायालयाने म्हटले. पॉल्सन जोसेफ याने डे यांच्या हत्येचा कट अमलात आणण्यासाठी आरोपींना आर्थिक मदत आणि सिमकार्ड उपलब्ध केल्याचा आरोप होता. परंतु हे सिद्ध करणारे पुरावे पोलिसांनी सादर केलेले नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली.

आरोपींवर ठपका

रोहित थंप्पन जोसेफ ऊर्फसतीश काल्या : राजनच्या इशाऱ्यावरून जे. डे यांच्या हत्येचा कट रचला.  साथीदारांची जमवाजमव केली. नैनीताल येथे जाऊन फरार आरोपी नयनसिंग बिश्त याच्याकडून पिस्तूल, २५ जिवंत काडतुसे घेतली. पॉल्सन जोसेफ याच्याकडून ग्लोबल सीम कार्ड घेत ८ ते १० जून २०११ या काळात सतत संपर्क साधला. तीन दिवसांपासून डे यांचा पाठलाग केला. संधी मिळताच ११ जून २०११ रोजी पवई परिसरात त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. डे यांच्या हत्येनंतर राजनने पाठवलेले ५ लाख रुपये स्वीकारले.

अनिल वाघमोडे : सतीश काल्याचा विश्वासू हस्तक. हत्येआधी मुलुंडच्या उमा बार येथे डे यांची ओळख पटवली. हत्येसाठी दुचाकीची व्यवस्था केली. डे यांच्या हत्येनंतर स्वत:च्या क्वालीस जीपमधून सर्व आरोपींसह अटक टाळण्यासाठी गुजरात, शिर्डी, शनिशिंगणापूर, सोलापूर, कर्नाटक येथील विजापूर येथे प्रवास.

मंगेश आगवणे : डे यांच्या हत्येसाठी दुचाकी उपलब्ध करून देणे. दहा हजार रुपयांच्या आमिषावर तीन दिवस डे यांच्या निवासस्थानी पाळत ठेवणे, हत्येच्या दिवशी त्यांचा पाठलाग करणे.

सचिन गायकवाड : घाटकोपर ते पवईदरम्यान क्वालीस जीपमधून डे यांचा पाठलाग केला. डे यांच्या निवासस्थानी पाळत ठेवली. स्वत:ची दुचाकी गुन्ह्य़ासाठी उपलब्ध करून दिली.

अभिजीत शिंदे : सतीश काल्यासोबत नैनीतालला जाऊन डे यांच्या हत्येसाठी पिस्तूल मिळवली. डे यांच्यावर पाळत ठेवली, पाठलाग केला.

निलेश शेंडगे : नैनीताल येथून शस्त्रसामुग्री घेतली. डे यांच्यावर पाळत ठेवली, पाठलाग केला. हत्येनंतर सतीश काल्याकडील पिस्तूल घेऊन पसार झाला.

विनोद असरानी : छोटा राजनच्या इशाऱ्यावरून डे आणि अन्य एका पत्रकाराला मुलुंड येथील उमा पॅलेस बार येथे भेटीसाठी बोलावले. तेथे त्याने आरोपींना डे यांची ओळख पटवून दिली म्हणजे याच व्यक्तीला मारायचे आहे असे संकेत दिले.

दीपक शिसोदीया : डे यांच्या हत्येसाठी सतीश काल्या आणि टोळीला २५ जिवंत काडतुसे उपलब्ध करून दिली. दीपकने अटकेनंतर गुन्हे शाखेकडे कबुली जबाबही दिला.

पॉल्सन जोसेफ : छोटा राजन, सतीश काल्या यांना ग्लोबल सीमकार्ड उपलब्ध करून दिली. डे यांच्या हत्येसाठी सतीश काल्याला दोन लाख रुपये दिले. तसेच पत्रकार जिग्ना वोरा आणि छोटा राजन यांची ओळख करून दिली. त्यानंतर जिग्ना आणि छोटा राजनने पॉल्सनच्या माध्यमातून एकमेकांशी सतत संपर्क ठेवला.

जिग्ना वोरा :  डे यांच्याविरोधात छोटा राजनचे कान भरले. सतत डे यांच्याविरोधात राजनला माहिती दिली.  डे यांच्या निवासस्थानाचा पत्ता आणि दुचाकीचा नोंदणी क्रमांक राजनला दिला. हत्येच्या दोन दिवसांआधी कार्यालयात काहीच न कळवता मुंबईबाहेर गेली. हत्येनंतर परदेशी अंमलीपदार्थ तस्करांनी डे यांची हत्या केली, अशी दिशाभूल करणारी बातमी केली.

छोटा राजन : डे यांच्या हत्या करण्याचे आदेश सतीश काल्याला दिले. त्यासाठी पैसे पाठवले.

जे. डे यांची हत्या हा लोकशाहीच्या चौथ्या खांबावरील हल्ला आहे. अशा प्रकारे हल्ले होत राहिले तर पत्रकार, पत्रकारिता आपली जबाबदारी पार पाडू शकणार नाही. हे लक्षात घेऊन खटल्याचे कामकाज पाहिले. गुन्हे शाखा, सीबीआयने गोळा केलेल्या पुराव्यांची मालिका न्यायालयासमोर ठेवून प्रत्येक आरोपी दोषी आहे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. न्यायालयाच्या निकालानंतर या प्रयत्नाचे सार्थक झाले. या निकालानंतर समाजात स्पष्ट संदेश जाईल आणि पत्रकारांवरील हल्ले रोखण्यास मदत होईल.  -अ‍ॅड. प्रदीप घरत, सीबीआयचे विशेष सरकारी वकील

 

गवळीनंतर संघटित टोळीच्या दुसऱ्या म्होरक्याला जन्मठेप

मुंबईच्या संघटीत गुन्हेगारी जगतातील जन्मठेपेची शिक्षा होणारा राजन दुसरा म्होरक्या ठरला आहे. याआधी अरुण गवळी याला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या खटल्यात विशेष मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

अटक आरोपींपैकी विनोद असरानी उर्फ विनोद चेंबूर याच्या मृत्यूनंतर राजनने परदेशातून आपला मित्र मनोज शिवदासानी याला फोन केला. या संभाषणात त्याने विनोदबद्दल चर्चा केली. त्यानंतर डे यांना का मारावे लागले याची पाश्र्वभूमी सांगितली. हे संभाषण गुन्हे शाखेने टिपले होते. त्यानंतर डे हत्याकांडात गुन्हे शाखेने दोन आठवडय़ांनी सतीश थंगप्पन जोसेफ उर्फ सतीश काल्या याला अटक केली. या घडामोडीच्या दुसऱ्याच दिवशी राजनने मुंबईतील काही निवडक पत्रकारांना फोन केले. डे यांची हत्या मीच घडवली, अशी माहिती दिली.

राजनला नोव्हेंबर २०१५मध्ये बाली विमानतळावर अटक केली गेली. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले. अटकेनंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने राजनच्या आवाजाचा नमुना घेतला. तो नमुना आणि गुन्हे शाखेने टिपलेले राजन-शिवदासानी यांच्यातील संभाषणाचा नमुना जुळला. गुन्हे शाखेने आरोपींकडून एकूण २५ मोबाईल फोन हस्तगत केले होते. तसेच डे यांच्या हत्येआधी आरोपी रवी रतेश्वर याने परदेशात असलेला राजन आणि अन्य आरोपींना ग्लोबल सीमकार्ड पुरवली होती. याच सीमकार्डच्या आधारे राजन, सतीश सतत संपर्कात होते. आरोपींमध्ये घडलेला संपर्क, त्यांचे नेमके वास्तव्य हा परिस्थितीजन्य पुरावा गुन्हे शाखा, सीबीआयने न्यायालयासमोर आणला.

‘त्याने हद्दच केली..’

‘त्याने (जे. डे) पत्रकार म्हणून हद्द पार केली. विरोधात बातम्या केल्या. ‘मूत्रपिंड खराब’, ‘व्हेंटीलेटरवर आहे’, ‘टोळी फुटली’, ‘दम राहिला नाही’, अशा खोटय़ा बातम्या देऊन त्याने बदनामी केली. तो सध्या दाऊद टोळीच्या संपर्कात आहे. माझ्याबाबतची गोपनीय माहिती तिथे देतो आहे. या सगळ्या गोष्टी कानावर आल्या आणि मी निर्णय घेतला’, असे राजनने फोन करून शिवदासानी याला सांगितले होते.

Story img Loader