पश्चिम उपनगरांतील एका व्यापाऱ्याची हत्या करण्यासाठी आलेल्या छोटा शकीलच्या तीन हस्तकांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले आहे. हस्तकांकडून दोन पिस्तुले, १२ जिवंत काडतुसे, मॅगझिन, ६ मोबाइल आणि दोन धारदार पातीही जप्त करण्यात आली आहेत.
खंडणीविरोधी पथकाच्या सूत्रांना माहिती मिळाली की, पश्चिम उपनगरांतील एका व्यापाऱ्याचा छोटा शकीलच्या सांगण्यावरून गोळीबार करून खून करण्यात येणार आहे. पथकाने जोगेश्वरी (प.) येथील मीना हॉटेल येथे बुधवारी सापळा रचला होता. त्या वेळी तीन व्यक्ती या ठिकाणी संशयितरीत्या फिरताना पोलिसांना दिसले. या तिघांना हटकून पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दोन पिस्तुले, १२ जिवंत काडतुसे, मॅगझिन, धारदार पाती आणि ६ मोबाइल सापडले. मायकल जॉन डिसोजा ऊर्फ राजू पिल्ले(४२), नईम फईम खान (४०), नितीन गुरव (२८) या तिघांना अटक झाली.

Story img Loader