एकेकाळचा सट्टेबाजअजय गोसालिया (४५, रा. चारकोप) उर्फ अजय गांडा याच्यावर बुधवारी संध्याकाळी मालाडच्या इन्फिनिटी मॉलजवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनकडून हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा तर्क आहे. गोसालिया हा छोटा शकीलचा हस्तक म्हणून ओळखला जातो.
गोसालिया सव्वाचारच्या सुमारास मॉलमधून बाहेर पडताच रस्ता ओलांडून एक तरुण त्याच्या दिशेने आला आणि त्याने पाच गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या गोसालियाच्या हात, गळा आणि पोटावर लागल्या. या प्रकाराने परिसरात एकच गोंधळ उडाला. हल्लेखोर समोर उभ्या असलेल्या इनोव्हा गाडीतून (एमएच ०४ ई एस ४७९२) पळून गेले. जखमी गोसालियाला त्वरित जेनेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी बांगूर नगर पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे.
दुसऱ्यांदा बचावला
गेल्या वर्षीसुद्धा गोसालियावर रघुलीला मॉलजवळ हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. पण ऐनवेळी हल्लेखोरांचे पिस्तुल लॉक झाल्याने तो बचावला होता.

Story img Loader