वांद्रे येथील एका भूखंडाप्रकरणी आमदार बाबा सिद्दिकी यांना थेट धमकी दिल्याच्या घटनेमुळे छोटा शकील पुन्हा सक्रिय झाल्याचे पोलिसांना वाटत आहे. याआधी छोटा शकीलने आबू सालेमला ठार करण्याचे आदेश दिले होते. संघटित गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत तर नाही ना, अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच ती वेळीच ठेचण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस पातळीवरून जारी करण्यात आल्याचे कळते.
एकेकाळी संघटित गुन्हेगारीचा कहर पसरवणाऱ्या मुंबापुरीत अरुण गवळी टोळी फारशी कार्यरत नाही. अमर नाईक चकमकीत ठार झाल्यानंतरही अश्विन नाईककडून खंडणीसाठी धमक्या दिल्या जात होत्या. वेगळ्या पद्धतीने अश्विन नाईककडून धमक्या आल्याचे आरोप झाल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने तातडीने कारवाई केली होती. परंतु अश्विनचा थेट संबंध स्पष्ट झाला नव्हता. छोटा राजन टोळीकडूनही आता खंडणीसाठी फारसे दूरध्वनी येत नाहीत. ‘प्रोटेक्शन मनी’ मिळत असल्यामुळे छोटा राजन टोळी आपल्या पद्धतीने कार्यरत असल्याची चर्चा होती. छोटा शकील टोळीतील काही गुंडच बिल्डर झाल्यामुळे दक्षिण मुंबईत खंडणीसाठी दूरध्वनी हा प्रकार कमी झाला होता. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या गाडीचालकावरील हल्ल्याच्या वेळी छोटा राजन टोळीचे नाव घेतले जात होते. त्यामुळे दाऊद आणि छोटा राजन टोळीतील संघर्ष वाढेल अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाची उकल करीत नेमके कारण शोधून काढल्याने ते थंडावले होते.
पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणात छोटा राजन टोळीचे नाव पुढे आले होते. त्यानंतर संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या फारशा कारवाया पुढे आल्या नव्हत्या. रवी तसेच हेमंत पुजारी वगळता कोणाचेही खंडणीसाठी दूरध्वनी येत नव्हते. परंतु आबू सालेमला ठार मारण्यासाठी दोन महिन्यापूर्वी देवेंद्र जगताप ऊर्फ जे. डी. याला दूरध्वनीवरून छोटा शकीलने सांगितले होते. त्यानंतर बाबा सिद्दीकीला छोटा शकीलने दिलेल्या धमकीनंतर गुन्हे अन्वेषण विभाग अधिक सतर्क झाला आहे. या घटना आम्ही गांभीर्याने घेतल्या असून छोटा शकील टोळी अधिक सक्रिय होऊ नये यासाठी कंबर कसली असल्याचे सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा