सलीम फ्रुट विरोधात काय आहेत आरोप?
मुंबईः दक्षिण मुंबईमधील उमरखाडी येथील २५ कोटी रुपये किंमतीची इमारत बळकवल्याच्या आरोपाखाली यूएईमधून हद्दपार करण्यात आलेला छोटा शकीलचा साडू सलीम फ्रुटला खंडणीविरोधी पथकाने सोमवारी अटक केली. संबंधित इमारत मालकाचा २००६ मध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर या इमारतीची मालकी २०१९ मध्ये त्याच्या पत्नीला मिळाली. याप्रकरणी कट रचल्याचा, बनावट कागदपत्रे सादर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणातील छोटा शकीलच्याही सहभागाबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तक्रारदार सनदी लेखापाल असून सध्या दक्षिण आफ्रिकेत राहतात. दक्षिण मुंबईतील उमरखाडी रोड येथील लम्बात इमारत ही तक्रारदारांच्या वडिलांच्या मालकीची होती. त्यांच्या वडिलांचे २००६ मध्ये निधन झाले. तक्रारदार दक्षिण आफ्रिकेत राहत असल्यामुळे त्यांनी या मालमत्तेची देखभाल व भाडेकरूंकडून भाडे जमा करण्यासाठी मे. एच. ए. करोलिया ॲण्ड सन्सचे मालक शबीर करोलिया व युसूफ करोलिया यांची नेमणूक केली होती. वडिलांच्या मृत्युनंतर करोलिया ॲण्ड सन्सकडून तक्रारदारांना गोळा केलेली भाड्याची रक्कम पाठवणे बंद केले. त्यांची बहिण २०१६ मध्ये मुंबईत आल्यानंतर तिने करोलिया यांना भाड्याबाबत विचारले असता त्यांनी संबंधित मालमत्ता २०११ मध्ये विकल्याचे सांगितले. त्यावर तक्रारदारांनी कॅनडातील एका मित्राच्या मदतीने मालमत्तेचे पत्रक मिळवले असता संबंधित मालमत्ता २०११ मध्ये शबीर करोलिया व युसुफ करोलिया यांना विकल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या वडिलांचे २००६ मध्ये निधन झाल्यानंतर २०११ मध्ये ते मालमत्ता कसे विकू शकतात, असा प्रश्न तक्रारदार यांना पडला. त्यांनी माहिती मिळविली असता तक्रारदारांच्या काकांना वडील म्हणून उभे करून संबंधित मालमत्तेची मालकी आरोपींनी मिळवल्याचे तक्रारदाराच्या निदर्शनास आले.
पुढे ती मालमत्ता करोलिया यांनी बाजार भावापेक्षा कमी किमतीत शाझिया सलीम कुरेशी (५० टक्के मालकी), यास्मीन अहमद (२५ टक्के मालकी) व शेरझादा खान (२५टक्के मालकी) यांना विकल्याचे निष्पन्न झाले. या मालमत्तेची ५० टक्के मालकी असलेली शाझिया ही सलीम फ्रुटची पत्नी आहे. यास्मीन अहमद व शेरझादा यांनी आपली प्रत्येकी २५ टक्क्यांची मालकी २०१९ मध्ये अस्लम पटनीला विकली. पटनीकडील ५० टक्के मालकीही पुढे शाझियाने खरेदी केली. अशा प्रकारे ही मालमत्ता सलीम फ्रुटने बळकवल्याचा आरोप आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंंतर तक्रारदारांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. मालमत्तेची नोंदणी दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्यामुळे याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात शबीर करोलिया, युसूफ करोलिया, मुस्लिम उमरेठवाला, रिझवान शेख, सुभाष साळवे, इब्राहिम लम्बात, शाझिया कुुरेशी, यास्मीन अहमद, शेरझादा खान, अस्लम पटनी व सलीम फ्रुट या ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते.
हेही वाचा >>> मुंबई: एमसीएच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
गुन्ह्यात दाऊद टोळीशी संबंधित सलीम फ्रुटचा सहभाग आल्यामुळे पुढे हे प्रकरण ३ ऑक्टोबर रोजी खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर आरोपी सलीम फ्रुट व पत्नी शाझिय यांनी अटकपूर्व जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. पण न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर मोक्का न्यायालयात अर्ज करून सलीम फ्रुटचा ताबा मिळवण्यात आला. सलीम फ्रुटसह याप्रकरणी मुस्लीम असगरअली अमरेटवाला (६२), शेरझादा जंगरेज खान (६३), अस्लम अब्दुल रेहमान पटनी (५६) व रिजवान अलाउद्दीन शेख (३५) यांनाही अटक करण्यात आली. याप्रकरणातील छोटा शकीलच्या सहभागाबाबत पोलीस तपास करीत आहेत. याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.