कुख्यात गुंड छोटा राजन याचा साथीदार डी. के. राव याला ठार मारण्याचा छोटा शकीलचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी हाणून पाडला. गुन्हे शाखेने याप्रकरणी छोटा शकीलच्या दोन गुंडांना अटक केली आहे.
राजनचा जवळचा साथीदार रवी बोरा उर्फ डी. के. राव याला बुधवारी सत्र न्यायालयात नेले जात असताना तेथेच त्याच्यावर गोळीबार करून ठार मारण्याची योजना दाऊदचा हस्तक छोटा शकील याने बनवली होती. परंतु गुन्हे शाखेने ती उधळून लावण्यासाठी कंबर कसली. सहपोलीस आयुक्त (गुन्हे) दातेंच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक तसेच खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वत्स आणि त्यांच्या सहकाऱ्यानी माहीम येथील नूर मोहंम्मद हॉटेलजवळ सापळा लावून दोन गुंडांना अटक केली. मोहम्मद कलबे सिद्दिकी (३०) व अख्तर जमाल खान (२५) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून रिव्हॉल्वर, चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत़

Story img Loader