मुंबई : उज्ज्वल भविष्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या तरुण प्रज्ञावंतांना दरवर्षी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कारा’ने गौरवण्यात येते. यंदा विविध क्षेत्रांतील १८ लखलखत्या तरुण तेजांकितांच्या या सन्मान सोहळ्यास देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुंबईत येत्या २९ मार्च रोजी हा सोहळा होईल.
कर्तव्यकठोर आणि उच्चविद्याविभूषित न्यायमूर्ती चंद्रचूड हे विधि व न्याय, संविधान, संसदीय लोकशाही, वैचारिक अधिष्ठान अशा विविध विषयांशी संबंधित देशातील एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व. देशाचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून नोव्हेंबर २०२२मध्ये त्यांनी सूत्रे हाती घेतली. तत्पूर्वी, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम पाहिले. मुंबई उच्च न्यायालयातही ते न्यायमूर्ती होते. दिल्ली आणि हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. हार्वर्डमधून त्यांनी कायदा या विषयात डॉक्टरेटही संपादित केली आहे. सर्वाधिक काळ देशाचे सरन्यायाधीश राहिलेले यशवंत चंद्रचूड हे त्यांचे वडील.
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचा हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून यशस्वीपणे राबवला जात आहे. आत्तापर्यंत देशभरातील ८० हून अधिक तरुण तेजांकितांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात आला आहे. यंदा पुरस्कारांचे सहावे पर्व असून विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य, कला, मनोरंजन, कायदा, धोरणे, राजकारण, प्रशासन, उद्याोग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रांतील १८ तरुण गुणवंतांचा सन्मान मुंबईत या आठवड्यात होणाऱ्या सोहळ्यात करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांतील अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ सोहळा रंगणार आहे. हा सोहळा निमंत्रितांसाठीच आहे.
हेही वाचा >>>लक्षद्वीपमध्ये भाजपचा अजित पवार गटाला पाठिंबा; राज्याबाहेरील एक जागा राष्ट्रवादीसाठी
निवडीचे आव्हानात्मक काम…
लोकसत्ता तरुण तेजांकितांची निवड आयआयटी, मुंबईचे प्राध्यापक डॉ. मिलिंद अत्रे यांच्यासह ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक डॉ. मुक्ता पुणतांबेकर, प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या मान्यवर परीक्षक समितीने केली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि राज्याबाहेरूनही या पुरस्कारासाठी शेकडो उमेदवारांनी अर्ज केले होते. या युवा प्रज्ञावंतांच्या कार्याची व्याप्ती आणि वैविध्य लक्षात घेत त्यातून मोजक्या विजेत्यांची निवड करण्याचे आव्हानात्मक काम या समितीने पार पाडले.
● कर्तव्यकठोर न्यायमूर्ती चंद्रचूड हे विधि व न्याय, संविधान, संसदीय लोकशाही, वैचारिक अधिष्ठान अशा विविध विषयांशी संबंधित आदरणीय व्यक्तिमत्त्व.
● देशाचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून नोव्हेंबर २०२२मध्ये त्यांनी सूत्रे हाती घेतली. तत्पूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम पाहिले होते.