मुंबई : शेतकऱ्यांना लाभ होईल अशा रितीने विज्ञान-तंत्रज्ञानाचे उपक्रम राबवावेत, त्याला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही देतानाच ठाण्यात विज्ञान केंद्र तर प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नावीन्यता उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केली.
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांनी आयोगाच्या कामकाजाबाबत तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक -आर्थिक विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण कृती कार्यक्रमांची माहिती दिली.
बैठकीत ठाण्यात विज्ञान केंद्र सुरु करणे, प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नावीन्यता उपक्रम केंद्र सुरू करणे, लोणार सरोवर (जि. बुलढाणा) येथे सुरू असलेला प्रकल्प गतीने पूर्ण करण्याबाबत निर्णय झाले. या बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते. आयोगाच्या जैव वैद्यकीय उपकरण निर्मिती उपक्रम व विविध प्रकल्प, बायोमेडिक पार्क, महाराष्ट्र जनुक कोष, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एमएसएमई आंतरवासिता या उपक्रमांची विविध योजना आणि धोरणांशी सांगड घालण्याचेही निश्चित करण्यात आले.
समृद्धी महामार्गालगत १८ नवनगरांचा विकास
आपल्या जंगलांमध्ये आणि परिसरात वनौषधी मोठय़ा प्रमाणात आहेत. शेतकऱ्यांना देखील त्यांची माहिती आहे. या सर्व नैसर्गिक संपत्तीचे मूल्यवर्धन होऊन, त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांचा नाशवंत माल दीर्घकाळ टिकावा यासाठीचे तंत्रज्ञान उपलब्ध करावे लागेल. यामुळे समृद्धी महामार्गालगतची १८ नवनगरे विकसित करता येतील. याठिकाणी विविध पायाभूत सुविधांच्या दृष्टीने विकास होईल, असे शिंदे यांनी सांगितले.