मुंबईः सायबर प्रयोगशाळेसह मुंबई पोलिसांच्या विविध उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात आले. भविष्यात सायबर गुन्हे रोखणे व सायबर गुन्हेगारांना पकडण्याचे मोठ्या आव्हान आहे. मुंबई पोलीस ते आव्हान पेलण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. आझाद मैदान येथील उत्कर्ष सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये महिला, तसेच नागरिक केंद्रीत सोयी – सुविधांची उभारणी करण्यात आली असून पोलीस ठाणी अधिकाधिक लोकाभीमूख झाली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुंबई पोलीस दल झाले अद्ययावत
सायबर गुन्हे रोखण्यासाठी तीन अत्याधुनिक सायबर प्लॅरयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. या प्रयोगशाळांचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. याशिवाय पोलीस ठाण्यांमध्ये महिला व बाल सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आले आहे. त्याशिवाय पार्क साईट पोलीस ठाण्याची नूतन इमारत, आझाद मैदान येथील उत्कर्ष सभागृहाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या नवीन मोटर सायकल, अद्ययावत, फॉरेन्सिक लॅब व्हॅन, निर्भया पथकाच्या व्हॅन यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आल्या. तसेच मुंबईतील ८७ पोलीस ठाण्यांतील महिला व बाल सहाय्यता कक्ष, २१६ पोलीस ठाणी व उपायुक्त कार्यालयांमध्ये उभारण्यात आलेली दूरदृष्य प्रणाली यंत्रणा, पोलीस विभागाचे एक्स हॅन्डल यांचे लोकार्पण, मिशन कर्मयोगी माहिती पुस्तिकेचे प्रकाशन व मिशनचे कार्यन्वयन, पोलीस प्रशिक्षण कार्यान्वित करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यानी पार्क साईट पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांशी संवाद साधून नूतन इमारतीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच लोकाभिमूख कारभार करण्याबाबतही सूचना केल्या. या कार्यक्रमाला गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायबर विभागाचे संख्याबळ वाढवणे आवश्यक
मुंबई पोलिसांना अद्ययावत पोलीस प्रयोगशाळा मिळाली असली, तरी वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागात तुलनेने अपुरे मनुष्यबळ आहे. सायबर विभागाचे उपायुक्त पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या उपायुक्तांना सायबर विभागाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. याशिवाय इतर ठिकाणीही अपुरे संख्याबळ आहे. तसेच सायबर विभागात काम करण्यासाठी अनेक वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी उत्साही नसतात, अशी चर्चा पोलीस दलात आहे.
प्रयोगशाळांमध्ये नेमके काय असणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डी. बी मार्ग येथील दक्षिण मुंबई विभागाच्या निर्भया सायबर प्रयोग शाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वरळी व गोवंडी येथीलही सायबर प्रयोगशाळांचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. मुंबईत सध्या दक्षिण, पूर्व, पश्चिम, मध्य व उत्तर अशा पाच सायबर पोलीस ठाण्यामध्ये पाच सायबर प्रयोगशाळा प्रस्तावित आहेत. यापैकी तीन प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या प्रयोगशाळांच्या माध्यमातून विशेषत्वाने सायबरच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे कमी कालावधीत सिद्ध करता येणार आहे. तसेच गुन्हा लपवण्यासाठी किंवा पुरावा नष्ट करण्यासाठी कुठल्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणातील डाटा डिलीट केल्यास, मोबाइलची तोडफोड केल्यास किंवा मोबाइल टेम्पर केल्यास अशा सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील सर्व डाटा आधुनिक संगणक प्रणालीच्या सहाय्याने पुन्हा मिळवणे शक्य होणार आहे. या प्रयोगशाळा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून अद्ययावत संगणक प्रणालीने (सॉफ्टवेअर) सक्षम आहेत. आर्थिक गुन्हेगारी संदर्भात ऑनलाइन पद्धतीने पैशांची हेराफेरी, बँक खाते हॅक करणे अशा पद्धतीच्या गुन्ह्यांवरही प्रयोगशाळेच्या माध्यमातून नियंत्रण मिळविण्यात येणार आहे.