‘मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधीमध्ये अर्ज केला, तेव्हा शासकीय पातळीवर कोणत्याही ओळखीशिवाय एवढा लगेच प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. कॅन्सरच्या आजारासाठी झुंजत असलेल्या माझ्या १४ वर्षांच्या मुलीवरील उपचारासाठी दोन लाख रुपयांचा धनादेश तात्काळ हाती पडला आणि राज्याला ‘जीवनदायी’ मुख्यमंत्री लाभल्याची खात्री झाली!’ ..अशाच प्रकारची शेकडो पत्रे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. आजर्पयच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून गरजू रुग्णांना दिली नसेल एवढी प्रचंड मदत गेल्या वर्षभरात केली गेली आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यापासून गेल्या दोन वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवेच्या अनेक योजना राबविण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागातील कॅन्सर रुग्णांना मुंबई-पुण्याकडे धाव घ्यावी लागू नये यासाठी महसूल विभागनिहाय अत्याधुनिक कॅन्सर उपचार व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला. राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या स्वरूपात बदल करून अधिकाधिक आजार, ज्यामध्ये ‘हिप’ व गुडघे रोपणाच्या शस्त्रक्रियेसह अनेक अत्यावश्यक आजारांचा समावेश केला. जे रुग्ण जीवनदायीच्या कक्षेत येत नाहीत अशा अनेक गरजू रुग्णांना ‘मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधी’च्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात आर्थिक मदत देण्यास देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. यात मोठय़ा आजारांच्या ९६४ रुग्णांना १४ कोटी २९ लाख रुपयांची मदत केली गेली. यामध्ये हृदयविकाराचे १३५ रुग्ण, कॅन्सरचे ३४४, मेंदू शस्त्रक्रियेचे १३८ रुग्ण, किडनीचे १७९ रुग्ण, तर अपघात, यकृत आदींच्या १५० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील लोकांना मुंबईत मंत्रालयात यासाठी यावे लागते हे लक्षात घेऊन आता नागपूर येथे २२ डिसेंबर रोजी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष’ स्थापन करण्यात आला असून, विदर्भातील रुग्णांना आता मदतीसाठी मुंबईपर्यंत यावे लागणार नाही.
[jwplayer sORo8A3J]
महत्त्व का?
पूर्वीच्या बहुतेक सर्व मुख्यमंत्र्यांच्या काळात सामान्यपणे पाच ते पंधरा हजार रुपये या योजनेमधून रुग्णांना मिळत असत. यासाठीही मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागत असत. मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याची अवघड कसरत पार पडल्यानंतर ही तुटपुंजी मदत हाती पडत असे. देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी स्वतंत्र विभाग तयार करून योग्य अधिकाऱ्याची नियुक्ती केली. येथे येणाऱ्या अर्जाची व आजारांची छाननी करून तत्काळ मदत देण्यास सुरुवात झाली. एक लाख रुपयांपासून तीन लाख रुपयांपर्यंत मोठय़ा आजारांसाठी मदत देण्यात येऊ लागली. यात हृदयविकार, किडनी, कॅन्सर, मेंदू विकार, अपघात, यकृत विकार आदी खार्चीक उपचार असलेल्या आजारांना प्राधान्य देण्यात आले. गेल्या वर्षभरात सुमारे साडेनऊ हजार रुग्णांना सुमारे १०३ कोटी रुपयांची मदत करण्यात आली.
‘प्रत्येक गरजू रुग्णाला उपचारासाठी मदत मिळालीच पाहिजे. राज्यातील शासकीय आरोग्य व्यवस्था भक्कम करणे, धर्मादाय पंचतारांकित रुग्णालयांमध्ये दहा टक्के रुग्णांना मोफत उपचार मिळणे, तसेच शासकीय आरोग्य व्यवस्थेचे जाळे सर्वदूर नेण्याला माझे प्राधान्य आहे. मधुमेह व रक्तदाब रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज असून त्यामुळे भविष्यातील अनेक आजारांना दूर ठेवता येईल. यासाठी आगामी काळात काही योजना राबविण्यात येतील.’
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
[jwplayer EKuUCkZ1]