मुंबई :आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांचे मूल्यमापन चांगल्या संस्थेकडून करण्याचे आणि रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्था व दर्जेदार सेवा निर्माण करण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य व वैद्याकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. महसूल, आरोग्य, वैद्याकीय शिक्षण आदी खात्यांच्या १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा फडणीस यांनी घेतला. या वेळी त्यांनी हे आदेश दिले.
फडणवीस पुढे म्हणाले की, सर्व शैक्षणिक संस्थांचे बळकटीकरण करा, औषध व अन्नपदार्थातील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करावी, वैद्याकीय शिक्षण महाविद्यालय परिसरात विद्यार्थी आणि परिसर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, आयुर्वेदिक महाविद्यालयामार्फत प्रकृती परीक्षण अभियान, योगा सेंटरची स्थापना, शासकीय वैद्याकीय महाविद्यालयांच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. तसेच वैद्याकीय संशोधन केंद्रांचे बळकटीकरण करणे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक लोकाभिमुख करावी व योजनेत सुधारणा करावी, वैद्याकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेपासून ते उत्तीर्ण होईपर्यंतच्या शैक्षणिक प्रक्रियेचे व्यवस्थापन करावे, आदी सूचना फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
हेही वाचा >>>अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात
ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याच्या सूचना
‘आपले सरकार’ संकेतस्थळाद्वारे सध्या ५३६ सेवा देण्यात येत असून, त्यांचा राज्यातील नागरिकांना चांगला लाभ होत आहे. त्यामुळे ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, गतिमान व पारदर्शक प्रशासनासाठी नागरिकांना ‘आपले सरकार’ संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. आता अधिक सक्रियतेने आणि सुलभपणे व्यापक स्वरुपात या संकेतस्थळाद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त ऑनलाईन सेवा उपलब्ध होतील, यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी आयोगाची कार्यपद्धती व भविष्यकालीन योजनांबाबत यावेळी सविस्तर माहिती दिली.