मुंबई : माहिती तंत्रज्ञान विषयक विविध समस्यांवर उपाय सुचविण्यासाठी ‘महा हॅकेथॉन चॅलेंज’ स्पर्धेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी येथे उद्घाटन झाले. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार आणि विविध खात्यांचे मंत्री उपस्थित होते.

नवीन तंत्रज्ञान संशोधक आणि उद्योजक, स्टार्टअप्स यांच्यासाठी ही स्पर्धा असून, राज्य आणि केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे तीचे आयोजन करण्यात आले आहे. विविध समस्यांवर प्रभावी आणि स्वदेशी उपाय उपलब्ध व्हावेत, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शासनात वापर, आपत्ती व्यवस्थापनात ड्रोनचा वापर, प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाचा वापर, भाषिणीचा वापर करून थेट ‘स्पीच अनुवाद’ असे या स्पर्धेसाठी विषय आहेत.

स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा २५ मार्च रोजी होईल. प्रत्येक गटातील प्रथम तीन संघांना त्यांचे तंत्रज्ञान (सोल्युशन) उपयोगात आणण्यासाठी निधी व अन्य मदत केली जाईल. पहिल्या तीन गटांसाठी १५ लाख रुपये आणि प्रमाणपत्र तर चौथ्या गटांसाठी पाच लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. विजेत्यांना राज्य शासनाच्या वतीने अंमलबजावणी व देखभाल करण्यासाठी नियुक्त केले जाईल. यामध्ये पहिल्या तीन गटांना दीड लाख रुपये प्रतिवर्ष तर चौथ्या गटांसाठी ५० हजार रुपये प्रतिवर्ष दिले जातील.

Story img Loader