मुंबई : ‘बृहन्मुंबई विद्याुत पुरवठा व परिवहन उपक्रमा’चा (बेस्ट) वाहतूक विभाग कायम तोट्यात असतो. यातून बाहेर पडण्यासाठी ‘बेस्ट’ने स्वत:चे उत्पन्नाचे स्राोत निर्माण करावेत. यासाठी ‘बेस्ट’च्या आगारांचा पुनर्विकास करताना त्यामध्ये रहिवासी, व्यावसायिक गाळ्यांचा समावेश करावा. अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधा पुरवून स्वत:चे उत्पन्न वाढवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

रिक्षा, टॅक्सी व मेट्रोपेक्षा बेस्टचे भाडे कमी असल्याने प्रशासनाच्या वतीने भाडेवाढीवर भर देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बेस्ट’चा आढावा घेतला. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर बसेसची संख्या वाढविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. ‘बेस्ट’वरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने तीन टक्के वाहतुकीसाठी राखीव तरतूद करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. छोटे, अरुंद रस्ते पाहता अत्याधुनिक छोट्या बस घ्याव्यात. यासाठी केंद्र सरकारकडून येणाऱ्या ‘राष्ट्रीय स्वच्छ वायू धोरण’(एन कॅप)च्या निधीचा वापर करावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

‘बेस्ट’चे व्यवस्थापक एस. श्रीनिवास यांनी पथकर माफीची मागणी केली. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या देण्यापोटीचे १६५८ कोटी सरकारकडून मिळावेत, सरकारी कर माफ करण्याची मागणी केली असता याविषयीचे प्रस्ताव सादर करावेत. सरकार सकारात्मक विचार करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. पाच बस आगारांच्या ठिकाणी चित्रपटगृह बस डेपोंचा पुनर्विकास करताना करमणूक केंद्रांचाही विचार करण्याबाबत आशीष शेलार यांनी सूचना केल्या. मराठी सिनेमाला ऊर्जितावस्था येण्यासाठी पाच ठिकाणी थिएटरची निर्मिती केल्यास उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

छोट्या गाड्यांचा प्रस्ताव तयार करा’

नागरिकांच्या सोयीसाठी मेट्रो स्टेशन आणि बेस्ट बसच्या मार्गाचे नियोजन करावे. यासाठी छोट्या अत्याधुनिक बसचा प्रस्ताव तयार करावा. नागरिकांच्या करारानुसार सोयीसुविधा पुरविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

वातानुकूलित बसचे उद्घाटन

बेस्टच्या ताफ्यात ५०३ वातानुकूलित आणि पूर्ण विद्याुत बस दाखल झाल्या आहेत. यातील विक्रोळी ते मुंबई सेंट्रल या बसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबईसाठी २,१०० वातानुकूलित बसची खरेदी करण्यात आली असून यातील ५०३ बस मिळाल्या, तर आणखी २,४०० बस मागविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.