मुंबई : स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र, स्वयंचलित चालक चाचणी केंद्र, एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चालकांना अनुशासित करून रस्ते अपघात कमी करण्यासाठी मोटार परिवहन विभागाने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. भविष्यात रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देऊन सर्वसामान्य जनतेला वाहन चालविण्याबाबत प्रबोधन आणि अनुशासनच्या माध्यमातून शिक्षित करण्याचे मोठे आव्हान परिवहन विभागाने स्वीकारणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोटार परिवहन विभागाचे मुख्यालय असलेल्या ‘परिवहन भवन’च्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वरळी येथे परिवहन आयुक्त कार्यालय ‘परिवहन भवन’ या इमारतीचे भूमिपूजन रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. सुमारे १२,८०० चौ.मी. बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीमध्ये एका वेळी १५० चारचाकी वाहने उभी करता येतील, इतकी चार मजल्याची भूमिगत वाहनतळ व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. ही इमारत पुढील अडीच वर्षांत बांधून पूर्ण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अप्पर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनराव उपस्थित होते.

भविष्यात नागरिकांनी वाहन खरेदी करताना त्यासाठी पार्किंग व्यवस्था आहे का नाही ? याची खात्री करणे आवश्यक असून जर स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल, तर महापालिकेच्या मदतीने सार्वजनिक पार्किंग व्यवस्थेचा वापर करण्याची हमी घ्यावी, अशा पद्धतीचे पार्किंग धोरण परिवहन विभागाने तयार करावे त्याला शासनाचा पूर्ण पाठिंबा असेल, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. देशभर जीएसटी लागू असल्यामुळे सीमा तपासणी नाक्यांचे महत्त्व कमी झाले असून भविष्यात व्यापार वृध्दीसाठी व मालवाहतुकीला चालना देण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व सीमा तपासणी नाके बंद करणे अनिवार्य ठरणार आहे. त्यामुळे परिवहन विभागाने १५ एप्रिलपर्यंत या संदर्भातील सर्व प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावे, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, परिवहन विभागाच्या माध्यमातून रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी आनंद दिघे यांच्या नावाने महामंडळ सुरू करून या असंघटित क्षेत्रातील रिक्षा व टॅक्सी चालकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आनंद दिघे रिक्षा व टॅक्सी चालक-मालक महामंडळाच्या माध्यमातून ६५ वर्षावरील बाबासाहेब कदम, अनंत कदम, लक्ष्मण गोळे, अरुण शिनलकर व पुरुषोत्तम सहस्रबुद्धे या रिक्षा व टॅक्स चालकांचा रुपये १० हजार रुपये सन्मान निधी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच परिवहन विभागामार्फत नागरिकांसाठी दिला जाणाऱ्या फेसलेस सेवेचे लोकार्पण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याला दरवर्षी १५ हजार कोटी रुपये महसूल मिळवून देणाऱ्या या विभागाच्या मुख्यालयाला स्वतः ची इमारत नव्हती. परिवहन विभाग स्थापन झाल्यापासून तब्बल गेली ८५ वर्ष या विभागाचे मुख्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये होते. परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर परिवहन विभागाच्या पहिल्या बैठकीमध्ये परिवहन विभागाच्या मुख्यालयाची स्वतःची इमारत बांधण्याचा संकल्प सोडला. त्यांनी सातत्याने पाठपुरावाही केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परिवहन विभागाच्या मुख्यालयाचे भूमिपूजन पार पडले.