मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे गतीने करून दिलेल्या मुदतीत ही विमानतळे कार्यान्वीत व्हावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यातील सर्व विमानतळांच्या बांधकाम प्रगतीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सहसचिव रुबिना अली, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>>माघी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी, घरगुती मूर्तीही पर्यावरणपूरकच हव्यात
विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रातील लहानसान गोष्टीवर देश आणि राज्याला काम करावे लागणार आहे. या क्षेत्रातील वाढती संख्या विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे. सोलापूर व कोल्हापूर येथे नाईट लँडिंग होईल, असे नियोजन करण्याचे आदेशही फडणवीस यांनी दिले.
कत्तलखाना, कचरा फेकण्यास बंदी
नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरू होणार असल्याने विमानतळापासून १० किलोमीटर परिसरात कत्तलखाने, कचरा आणि इतर प्रदूषित किंवा घातक पदार्थ टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी सरकारने विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली एरोड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे.