मुंबई : मुंबई महापालिकेच्या सुरू असलेल्या सुमारे एक लाख ४१ हजार कोटी रुपयांच्या तसेच प्रस्तावित सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानभवनात घेतलेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबईतील विविध प्रकल्प तातडीने पूर्ण करा, असे आदेश दिले.
महापालिकेने नालेसफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. महापालिकेच्या वतीने पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनि:सारण प्रकल्प, आरोग्य विभागाचे सुमारे एक लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. छत्रपती संभाजी महाराज सागरीकिनारा मार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले असून या मार्गाच्या परिसरात हाजी अली येथे १२०० क्षमतेचे वाहन तळ उभारण्यात यावे, असे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगाने कामे मार्गी लावावीत. प्रस्तावित प्रकल्पांसाठीच्या निविदांची कामे महिनाभरात पूर्ण करावीत. मुंबईला पाणी पुरवठ्यासाठी गारगाई प्रकल्प महत्त्वाचा असून पुनर्वसन प्रक्रिया व इतर कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सध्या महापालिकेच्या वतीने ७०० किमी रस्त्यांच्या सिमेंट कॉँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. पावसाळ्यात या कामांचा नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.