मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज यासह अनेक कल्याणकारी व लोकप्रिय योजना बंद होतील, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केला. महायुती सरकारच्या योजना केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेल्या नसून आम्ही सत्तेवर आल्यावरही त्या कायम सुरू राहतील, अशी ग्वाही शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामगिरीचे संक्षिप्त प्रगतीपुस्तक ‘रिपोर्ट कार्ड’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आले आहे. यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे, फडणवीस व पवार यांनी महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठविली. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर आमच्या सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याचा दावा शिंदे यांनी केला. महाविकास आघाडी आपल्या कार्यकाळात अनेक घोषणा आणि  आश्वासने दिली. मात्र ती पूर्ण न करता हात वर केले. वचनपूर्तीचा अहवाल सादर करण्यासाठी हिंमत लागते. विकासविरोधी दृष्टिकोन ठेवत आघाडी सरकारने अडीच वर्षे राज्याचे नुकसान केले. मात्र महायुती सरकारने विकास, उद्याोगस्नेही धोरणे, कल्याणकारी योजना आखत महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर नेले. पायाभूत क्षेत्रात अभूतपूर्व काम करीत अटल सेतू, सागरी मार्ग, मेट्रो रेल्वे, समृद्धी महामार्ग याद्वारे राज्याच्या विकासाला वेग दिला. आमच्या सरकारकडे देण्याची नियत आहे आणि नीती आहे. त्यामुळे प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या सरकारच्या कामगिरीमुळे विरोधक बिथरले असून खोटे व असंबद्ध बरळत आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली.

हेही वाचा >>>सरकारकडून आचारसंहितेचा भंग? निवडणूक जाहीर झाल्यानंतर घेतलेले निर्णय वादाच्या भोवऱ्यात

योजनांसाठी आर्थिक नियोजन – फडणवीस

फडणवीस म्हणाले की, स्थगिती सरकार गेल्यानंतर गेल्या सव्वादोन वर्षांत जनतेने गतिमान आणि प्रगती सरकारचे काम अनुभवले आहे. सरकारकडे पैसे नसल्याने लाडकी बहीण योजना निवडणूक झाल्यावर बंद होणार, अशी अफवा विरोधक पसरवीत आहेत. पण आमच्या सरकारच्या योजना केवळ कागदावर नसून त्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय जाहीर केला आणि निवडणूक जिंकल्यावर लगेच मागे घेतला. आम्ही तसे करणार नसून सौरऊर्जा प्रकल्प पुढील दोन वर्षात कार्यान्वित झाल्यावर सरकारला स्वस्त वीज मिळून पैसे वाचतील आणि शेतकऱ्यांना मोफत वीज कायम सुरूच राहील.

विरोधकांकडून अपप्रचार – अजित पवार

महायुती सरकारचे अभूतपूर्व काम पाहून विरोधक गडबडले आहेत. सर्वसामान्यांच्या जीवनात घडलेले बदल विरोधकांच्या पचनी पडत नसल्याने ऊठसूट अपप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राज्य कर्जबाजारी झाले आहे, असे सांगून लाडकी बहीण योजनेबाबत अपप्रचार होत आहे. मात्र दोन कोटी ३० लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पाच महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत. या योजनेसाठी आधी १० हजार कोटी रुपये व नंतर ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील, असे स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde allegation regarding maha vikas aghadi government schemes amy