मुंबई : नौदलाचे सामर्थ्य, त्याचे युद्ध कौशल्य आणि दैनंदिन जीवनमान याचा अनुभव घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि आमदार उद्या नौदलाच्या युद्धनौकेवरून एक दिवस समुद्र सफर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या या उपक्रमाची सर्व राज्यांनी अंमलबजावणी करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार राज्यात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
देशाच्या लष्करी सामर्थ्यांची, युद्ध कौशल्याची तसेच जवानांच्या जीवनमानाची लोकप्रतिनिधींना ओळख व्हावी आणि लष्कराप्रति लोकांची आदराची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींचा एक दिवस लष्करासोबत असा अभिनव उपक्रम राबविण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. त्यानुसार नौदल, हवाईदल किंवा सैन्यदलाच्या तळावर एक दिवस घालवण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उद्या नौदलाच्या तळावर जाणार असून दिवसभर युद्धनौकेवरून समुद्र सफर करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कामगारमंत्री सुरेश खाडे, बंदरे विकासमंत्री दादा भुसे यांच्यासह काही मंत्री, विधिमंडळातील पिठासन अधिकारी, खासदार आणि आमदार आणि त्यांचे कुटुंबीय युद्धनौकेस भेट देणार आहेत. या भेटीच्या वेळी नौदलातर्फे पाणबुडी, युद्ध नौकेवरील प्रात्यक्षिक, हेलिकॉप्टर ऑपरेशन, एअरक्राफ्ट कॅरिअर, सागरी (मरिन) कमांडोजमार्फत प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. तसेच बचाव आणि शोधकार्य, नौदलाच्या विमानातर्फे हवाई प्रभुत्वाची प्रात्यक्षिके, आपत्कालीन प्रसंगाची प्रात्यक्षिके नौदलाकडून दाखविली जाणार आहेत. भारतीय नौसेनेच्या पश्चिम विभागाने महाराष्ट्र विधानमंडळाच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन केले असून मुख्यमंत्री, मंत्री तसेच अन्य लोकप्रतिनिधी या वेळी नौदल अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली.