मुंबई : अयोध्येत राम मंदिर व्हावे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि तमाम रामभक्त- हिंदूत्ववाद्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. रामाच्या आशीर्वादानेच आपल्याला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले. अयोध्या आणि राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा नव्हे तर सर्वासाठी श्रद्धेचा, अस्मितेचा, हिंदूत्वाचा विषय आहे. त्यामुळेच हिंदूत्वाला विरोध करणाऱ्यांची दुकाने आता बंद होत आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला अयोध्येतील पत्रकार परिषदेत रविवारी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अयोध्येत रामलल्ला आणि मंदिराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भेटी दिल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी राम मंदिर, हनुमान गढीला भेट देत शरयू नदीवर महाआरती केली. अयोध्येत शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपणच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय वारसदार असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असून त्यासाठी जागा देण्याबाबत मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचेही शिंदे यांनी सांगितले. या पूर्वीही आपण आयोजनासाठी अयोध्येत आलो होतो. मात्र प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाल्यावर आणि शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह मिळाल्यावर प्रथमच अयोध्येत आलो आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. लखनौपासून अयोध्यापर्यंत झालेल्या अपूर्व स्वागताने मी भारावून गेलो आहे. आजचा दिवस माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा असून येथून ऊर्जा घेऊन राज्य सुजलाम् सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आपल्या दौऱ्याने विरोधकांना पोटदुखी उद्भवली असून त्यांना हिंदूत्वाचीही अॅलर्जी झाली आहे. त्यामुळेच ते कधी सावरकरांचा तर कधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करत आहेत. तर सत्तेसाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे सावकरांचा अपमान सहन करणार नाही, असे बोलण्यापलिकडे काही करताना दिसत नाहीत. मात्र हिंदूत्व देशात घराघरात पोहोचल्यास आपले दुकान बंद होण्याच्या धास्तीने हिंदूत्वास विरोध करणारेच आता संपत आहेत. हिंदूत्व आणि सावरकरांना विरोध करणाऱ्यांचे संख्याबळ ४०० वरून ४० पर्यंत घटले आहे. मोदींना विरोध करीत राहिल्यास दुकाने बंदच होतील, असा इशाराही शिंदे यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला दिला.
वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी १४ वर्षे वनवासाला जाणारे प्रभू राम आणि बाळासाहेबांनी ज्यांना कायम दूर ठेवले त्यांच्यासह सत्ता स्थापन करणारे, हे कसले बाळासाहेबांचे वारसदार, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. आपल्या दौऱ्याची फालतूगिरी अशी संभावना करणारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना जनताच धडा शिकवेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली. ‘‘मी आधीच मोठे राजकीय ऑपरेशन केले आहे. या लोकांना ऑपरेशनची गरज नाही, छोटय़ा-मोठय़ा गोळय़ांनी यांचे काम होते, असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावला.
फडणवीस यांचीही उपस्थिती
मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर सकाळी रामलल्लाचे दर्शन आणि आरती तसेच मंदिराच्या बांधकामाच्या ठिकाणी भेट दिली तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. कर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता नवी दिल्लीत सायंकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामुळे फडणवीस हे दर्शन घेऊन लगेचच नवी दिल्लीत परतले.
‘टीका करणे हे त्यांचे कामच’
‘कारसेवक म्हणून राम मंदीराच्या लढय़ात सहभागी झालो. आता स्वप्न साकार होत असल्याचे पाहून समाधान वाटते, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. टीका करणे हे विरोधकांचे काम आहे, पण महात्मा गांधी यांनी सांगितलेली रामराज्याची कल्पना सत्यात उतरविण्यासाठी आणि आम्ही रामभक्त म्हणून अयोध्येला आलो. रामराज्य आणण्यासाठी रामदर्शन घेण्यात गैर काय, असा सवालही फडणवीस यांनी केला.
‘नुकसानीच्या पाहणीचे आदेश’आपल्या अयोध्या दौऱ्यावर विरोधक टीका
करीत असले तरी राज्यात अवकाळीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आज सकाळीच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शिंदेंचे अयोध्येत शक्तिप्रदर्शन
- ’शिंदे यांनी रविवारी अयोध्येत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण शहर भगवेमय झाले होते.
- ’लखनौ विमानतळापासून अयोध्या मार्गावर आणि शहरात ठिकठिकाणी स्वागताचे मोठे फलक लावण्यात आले होते.
- ’उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही मुख्यमंत्र्यांसह अयोध्येत आल्यानंतर मिरवणुकीने ते दर्शनाला गेले.
- ’उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली तसेच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.